Breaking News

शिवडे येथून दोन म्हशींसह रेडकू चोरीस


उंब्रज / प्रतिनिधी : महामार्गालगत शिवडे (ता. कराड) येथील जनावरांच्या गोठ्यातील दोन म्हशी व एक रेडकू चोरीस गेल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी वराडे येथील शेतकर्‍याने उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चोरीस गेलेल्या म्हशींची किंमत 80 हजार रुपये व 30 हजार रुपये किंमतीचे रेडकू आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, वराडे (ता. कराड) येथील शेतकरी दादासाहेब तुकाराम साळुंखे यांची सेवा रस्तालगत एका पेट्रोल पंपासमोर पुर्वेस शिवडे व वराडे गावच्या हद्दीवर शेतजमीन आहे. रस्तालगतच त्यांचा जणावरांचा गोठा असून गोठ्यात दोन दुभत्या म्हैशी दोन रेडकू आणि इतर जनावरे आहेत. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जणावरांना वैरण टाकून साळुंखे हे नेहमीप्रमाणे घरी निघून गेले होते. मंगळवारी सकाळी ते गोठ्यात आले तेव्हा त्यांना दोन म्हैशी व पुर्ण वाढ झालेले रेडकू दिसले नाही. त्यांनी इतरत्र शोधाशोध केली मात्र जणावरे मिळून आली नाहीत. चोरीचा संशय आल्याने त्यांनी जनावरांचे आसपासचे बाजार पालथे घातले त्यानंतर सायंकाळी उंब्रज पोलीस ठाण्यात म्हैस चोरीची तक्रार दिली आहे. केवळ ही जनावरेच दादासाहेब साळुंखे यांचा कुटुंबाचे उदर्निवाहाचे साधन होते. त्यामुळे चोरीस गेलेल्या म्हशी शोधून काढण्याचे आवाहन उंब्रज पोलिसांसमोर आहे.