Breaking News

दहशतवादाचे संकट पूर्वीच्या सरकारमुळे गंभीरः मोदी


नवीदिल्लीः भारताने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये केलेल्या कारवाईचे पुरावे मागणार्‍यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार ‘स्ट्राइक’ केला. यापूर्वी झालेले हल्ले आणि बॉम्बस्फोटाचे कनेक्शन पाकिस्तानशी जोडले होते; पण आधीच्या सरकारने काय केले, असा सवाल करीत पूर्वीच्या सरकारच्या धोरणामुळेच दहशतवादाचे संकट आणखी गहिरे झाले, असा आरोप मोदी यांनी केला.
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे झालेल्या कार्यक्रमात काँग्रेस आघाडीच्या सरकारला टीकेचे लक्ष्य करताना मोदी म्हणाले, की पाकिस्तानने कुरघोडी केल्यानंतर त्यांनी फक्त गृहमंत्री बदलला. तुम्ही मला सांगा अशा परिस्थितीत गृहमंत्री बदलायचा की, धोरण?
मुंबईवरील 26/11 हल्ल्यानंतर सैन्य दल बदला घेण्यासाठी तयार होते; पण त्यांना परवानगी देण्यात आली नाही. 2016 साली उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. सरकारने झोपून राहावे असे तुम्हाला वाटते का? चौकीदार झोपत नाही. पुलवामा हल्ल्यानंतर आपल्या सैनिकांनी घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि पाकिस्तानला धक्का दिला.
‘एअर स्ट्राइक’नंतर पाकिस्तान रडत होता. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने तयारी केली होती. उरी सारखा सर्जिकल स्ट्राइक होईल असे त्यांना वाटले होते; पण आपण हवाई हल्ला केला. भारत सर्जिकल स्ट्राइक सारखे काही तरी करेल, असे पाकिस्तानला वाटले. त्यांनी सीमेवर सुरक्षा वाढवली. सैनिक, रणगाडे तैनात केले; पण आपण हवाई मार्गाने गेलो आणि हल्ला चढवला. पाकिस्तानची झोप उडवून दिली. या कारवाईने पाकिस्तान इतका घाबरला, की सकाळी पाच वाजल्यापासून त्यांनी ट्विट करायला सुरुवात केली. पाकिस्तानातून सर्व बातम्या आल्या असे मोदी यांनी सांगितले.
आधीच्या सरकारच्या धोरणांमुळे दहशतवादाचे संकट अधिक गंभीर बनल्याचा आरोप मोदी यांनी केला. ‘सर्जिकल आणि एअर स्ट्राइक’नंतर आता हा जुना भारत राहिलेला नाही, हे दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना कळून चुकले आहे असे मोदी म्हणाले. देशाचे वीर जवान आपली जबाबदारी निभावत आहेत. देशाचे नागरिक म्हणून आपल्यालाही सर्तक राहून आपली जबाबदारी निभावायची आहे. 2014 पासून आम्ही मजबूत, सशक्त भारत बनवण्यासाठी काम करत आहोत, असे मोदी यांनी सांगितले.