Breaking News

बँकांनी मराठा तरूणांना कर्जप्रकरणे नाकारू नयेत


पाटण,  (प्रतिनिधी) : आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज देताना पक्ष अथवा तोंड पाहून कर्ज दिले जाणार नाही. कागदपत्रे व तरूणाची गरज लक्षात घेवूनच कर्ज दिले जाणार आहे. मराठा समाजातील अधिकाधिक तरूणांना कर्ज देवून त्यांच्यातील उद्योजकता जागा करून त्याला स्वत:च्या पायावर उभा करणे हे महामंडळाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे कागदपत्रांची शंभरटक्के पूर्तता केली असल्यास बँकांनी मराठा समाजातील तरूण बांधवांना कर्ज नाकारू नये. कर्ज देण्यास कोणतीही बँक अडवत असेल तर अशा प्रकरणात कार्यकर्त्यांना माझी मुभा असेल आणि त्यानंतर काही घडल्यास त्यास सर्वस्वी बँक अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील यांनी आढावा बैठकीत बोलताना दिला.

येथील तहसील कार्यालयाच्या प्रतिक्षालयात घेण्यात आलेल्या आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांत अधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, महाबँकेचे जिल्हा प्रबंधक महादेव शिरोळकर, मल्हारपेठ शाखाधिकारी वसंत काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. नरेंद्र पाटील पुढे म्हणाले, सर्वात अगोदर बीड जिल्ह्यात बैठक घेतली, त्यावेळी असे लक्षात आले की बँकेचे अधिकारी युवकांना कर्ज देण्यासाठी टोलवाटोलवी करत आहे. सातारा जिल्ह्यातही अडचणी निर्माण झाल्या होत्या. म्हणून वाई, महाबळेश्र्वर, खंडाळा, जावली, कोरेगाव, कराड उत्तर-दक्षिण आणि आज पाटणमध्ये बैठक घेतली. त्यानंतर सातार्‍यातही बैठक होणार आहे. मराठा समाजातील तरूणांना कोणतीही कारणे सांगून मागे पाठवू नये. मराठा तरूण उद्योजक व्हावा या दृष्टीकोनातून बँकेने मराठा समाजातील युवकांना मार्गदर्शन करावे. ही बैठक कर्जदार आणि बँक अधिकारी यांच्यातील जो दुरावा निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी घेण्यात आली आहे. या योजनेतील अडचणी कर्जदारांनी समजून घेवून त्यादृष्टीने बँकेला सहकार्य करावे. जुन्या कर्जाबरोबरच जो युवक शुन्यातून उद्योग निर्माण करणार आहे त्या युवकाच्या पाठीशी बँकेने उभे रहावे. महामंडळामार्फत 16 प्रकरणे मंजूर झाली असून हा आकडा समाधानकारक नसला तरी सुरूवात मात्र चांगली झाली आहेे. नवनवीन युवकांना कर्ज देवून ते उद्योजक बनले तरच मुख्यमंत्र्यांचा या योजनेचा उदेश सफल होईल. त्यासाठी बँकांनी मराठा समाजातील युवकांना प्राधान्य द्यावे. मराठा युवकांच्या काही अडचणी असल्यास त्या सोडविण्यासाठी तालुकास्तरावर महामंडळामार्फत तहसील कार्यालयात माहिती केंद्र उभारला असून त्याद्वारे युवकांना मार्गदर्शन केले जाईल, असे त्यांनी सांगितले. या आढावा बैठकीत बँक अधिकारी व कर्जदार यांच्यातील अडचणी समजावून घेवून कर्जदारांच्या शंकेचे निरसन समारोसमोर करण्यात आले. यावेळी कर्जदारांनी बँक अधिकारी 

प्रकरणाबाबत नकारात्मक भूमिका घेत असल्याच्या जास्त तक्रारी कर्जदारांनी मांडल्या. तर बँक अधिकार्‍यांनी अपुरा कर्मचारी तसेच कागदपत्रांच्या पुर्तता अभावी कर्ज नाकारल्याचे सांगितले. काही बँकेच्या अधिकार्‍यांनी तर ही योजनाच आम्हाला माहित नसल्याचे कर्जदारांनी सांगितल्यावर संबंधित अधिकार्‍यांना योजनेबाबतची माहिती ना. पाटील यांनी बैठकीत सांगितली. भाजपाच्या कविता कचरे यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले. बैठकीस पाटण तालुक्यातील मराठा युवक, उद्योजक, मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.