Breaking News

मुख्यमंत्र्यांना खडसावले हायकोर्टाने विविध खाती सांभाळताना कार्यक्षमता दाखविण्याचा सल्ला


मुंबई / प्रतिनिधीः
‘मुख्यमंत्री आहात की एका पक्षाचे नेते आहात? विविध खाती सांभाळताना कार्यक्षमताही दाखवा,’ असे खडे बोल उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना सुनावले आहेत. दाभोलकर-पानसरे प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष द्यायला हवे, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे.

दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येनंतर दोन्ही कुटुंबीयांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पत्नी डॉ. शैला दाभोलकर, मुलगी मुक्ता दाभोलकर त्याचप्रमाणे पानसरे यांची सून डा.ॅ मेघा पानसरे कुटुंबीय उपस्थित होते. डॉ. शैला या पहिल्यांदाच न्यायालयात आल्या होत्या. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर 2013 मध्ये अज्ञातांनी गोळ्या झाडून खून केला, तर 2015 मध्ये कॉ. गोविंद पानसरे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी दाभोलकर-पानसरे कुटुंबीयांनी न्यायालयात याचिका दाखल केली. यावर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती बी.पी. कोलोबावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.

मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत. वरिष्ठ अधिकारी, सचिव यांनी ही यामध्ये लक्ष घालायला हवे, असे मतही न्यायालयाने नोंदविले. या प्रकरणात उच्च न्यायालयाला लक्ष घालावे लागत आहे, हे चुकीचे असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. दाभोलकर आणि पानसरे या दोन्ही कुटुंबीयांनी केलेल्या मागणीनुसार हा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. गुरूवारी झालेल्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने गृह खात्याची जबाबदारी असलेल्या मुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावले. जर खालच्या अधिकार्‍यांना तपासात अपयश येते, तेव्हा वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालायला हवे. फरार आरोपी बाबत बक्षीस वाढवल्याने आरोपी लोक पकडून देतील हा भ्रम आहे. आरोपींना पकडण्याची जबाबदारी ही पोलिसांचीच असते, असे न्यायालयाने सुनावले.