Breaking News

मावळमधून आबांची कन्या लढणार? राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आग्रहपुणे /प्रतिनिधीः
मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांचे नाव मागे पडल्यानंतर आता आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी मावळमधून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तसा आग्रह त्यांच्याकडे धरला आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस मावळ लोकसभा मतदारसंघात तगडा उमेदवार देण्याच्या प्रयत्नांत आहे. पार्थ पवार यांचे नाव अगोदर चर्चेत होते; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच त्या नावावर फुली मारली. त्यानंतर शेकापला हा मतदारसंघ सोडला जाण्याची शक्यता व्यक्त होत होती; परंतु जयंत पाटील व मीनाक्षी पाटील यांना लोकसभेपेक्षा विधानसभेच्या निवडणुकीत जास्त रस आहे. त्यामुळे या मतदारसंघातून राष्ट्रवादीला तगडा उमेदवार द्यावा लागेल. अजून कोणत्याही व्यक्तीचे नाव दृष्टिपथात नसले, तरी एक नवा चेहरा म्हणून स्मिता पाटील यांचे नाव पुढे आले आहे. स्मिता पाटील यांचा या मतदारसंघात सध्या फारसा संपर्क नसला, तरी वडिलांची पुण्याई आणि राष्ट्रवादीच्या ताकदीवर हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यातून घेतला जाऊ शकतो, असा विश्‍वास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आहे.

खा. श्रीरंग बारणे यांच्याविरोधात भाजपची नाराजी आहे. त्यामुळे मावळमध्ये तगडा उमेदवार दिला तर ही जागा जिंकली जाऊ शकते, असा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीला नकार दिल्यानंतर स्मिता पाटील यांचे नाव पक्षाने मावळसाठी पुढे आणले आहे. याबाबत स्मिता पाटील यांच्याशी पक्षाच्या नेत्यांची प्राथमिक बोलणी झाली आहे. फक्त स्मिता पाटील यांच्याकडून होकार येण्याची पक्ष वाट बघतो आहे. स्मिता पाटील यांचे सासर पुणे जिल्ह्यात आहे.


सहानुभूतीचा फायदा उठविण्याचा प्रयत्न

मावळ मतदारसंघात येणार्‍या पनवेल आणि त्या लगतच्या परिसरात आर. आर. पाटील यांच्याबद्दल डान्स बार बंदीच्या निर्णयामुळे प्रचंड सहानुभूती आहे. राज्यात या भागात सर्वात जास्त डान्सबार होते. ते बंद झाल्यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होण्यापासून वाचली आहे. डान्सबार बंदीच्या निर्णयाचा पुढे स्मिता पाटील यांनीही पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यामुळे त्यांच्याबद्दलही या भागात सहानभूती आहे. त्याचबरोबर मावळ, पिंपरी चिंचवड या भागातही आर. आर. पाटील यांच्यामुळे स्मिता यांच्याबद्दल सहानुभूती असून त्याचा फायदा या मतदारसंघात होऊ शकतो, असा पक्षाचा दावा आहे.