Breaking News

सचिन म्हस्के यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड


घोटण/प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील घोटण गावचे सुपुत्र व शेतकरी कुटुंबातून असणारे सचिन शिवाजी म्हस्के यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. एमपीएससी मार्फत झालेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर ही बातमी समजताच गावात आनंदाचे वातावरण तयार झाले. सोशल मीडियाच्या साह्याने ही आनंदाची बातमी अधिक झळकली. त्यामुळे शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर सुरू झाला. व लगेच त्यापाठोपाठ विविध ठिकाणी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. सचिन म्हस्के हे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील होतकरू व अभ्यासू व्यक्तिमत्व ठरले. घरची गरिबी परिस्थितीची लाज न बाळगता त्यांनी हे घवघवीत यश संपादन केले आहे.

गेल्या अनेक दिवसापासून त्यांनी सातत्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून हे यश पदरी पाडले. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक नवा आदर्श समोर ठेवला आहे. हे त्यांच्या कष्टाला मिळालेले प्रामाणिक पणाचे फळ आहे. त्यांचे माध्यमिक शिक्षण घोटण व महाविद्यालयीन शिक्षण शेवगाव येथे झाले. त्यांच्या निवडीमुळे गावकर्‍यांनी त्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढली. गावातील अनेक मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला. शेवटी बोलताना सचिन म्हस्के यांनी मिळालेल्या यशाबद्दल गावकर्‍यांशी संवाद साधला व त्यांनी गावकर्‍यांचे आभार मानले. त्यांच्या निवडीमुळे त्यांची तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे.