Breaking News

नगर लोकसभेचे अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात


अहमदनगर/प्रतिनिधी : नगर लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना आज (दि.28) जारी होणार असून त्या दिवसापासूनच नामनिर्देश प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले असून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याचे म्हटले आहे. 

याबाबत अधिसूचना जारी होण्याच्या आधी श्री. द्विवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) जितेंद्र पाटील, विनिर्दिष्ट सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, तहसीलदार हेमा बडे, नायब तहसीलदार श्री.गोसावी यांची यावेळी उपस्थिती होती.
37-अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार (दि. 28) अधिसूचना निघेल. नामनिर्देशन भरण्याचा अंतिम दिनांक 4 एप्रिल (गुरुवार) असून नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 एप्रिलला होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 एप्रिल आहे. दिनांक 23 एप्रिलला मतदान होणार असून दि. 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचे ठिकाण हे जिल्हाधिकारी, अहमदनगर यांचे दालन, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर हे निश्‍चित करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांना सहाय्य करण्यासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. 15, नगर) अजय मोरे यांची नियुक्ती विनिर्दिष्ट सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीसाठी एकूण 17 अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जातील, अशी माहिती श्री. द्विवेदी यांनी दिली.

नामनिर्देशनपत्र भरताना उमेदवारांसह केवळ 4 जणांनाच दालनात येता येईल. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या कक्षात मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पर्यायापैकी कोणत्याही पर्यायाचा वापर करुन अर्ज भरता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नामनिर्देशनपत्र भरण्याच्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला असून या ठिकाणापासून 100 मीटर परिसरात या प्रक्रियेदरम्यान फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. तीनपेक्षा जास्त वाहने आणि 4 पेक्षा जास्त व्यक्तींना घेऊन नामनिर्देशन ठिकाणामध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, असे श्री. द्विवेदी यांनी स्पष्ट केले.

आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत असून सी व्हीजिल अ‍ॅपच्या माध्यमातून आलेल्या 35 तक्रारींची तत्काळ दखल घेऊन त्याचे निराकरण करण्यात आले आहे. याशिवाय, मतदार यादीतील नाव तसेच अनुषंगिक माहितीसाठी आतापर्यंत 1950 या हेल्पलाईन क्रमांकावर 2001 इतके दूरध्वनी आले. त्यांचे समाधान करण्यात आले.

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन्सची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झाली असून या यंत्रांचे प्रथम सरमिरळ प्रक्रिया (रॅन्डमायजेशन) पूर्ण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची उपस्थिती होती. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रे विधानसभा मतदारसंघनिहाय हस्तांतरित करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या मतदारसंघात एकूण 2030 इतके मतदान केंद्र असणार आहेत. यात 11 सहाय्यकारी मतदानकेंद्रांचा समावेश आहे. अहमदनगर लोकसभा निवडणुकीत एकूण 18 लाख 46 हजार 314 मतदार असणार आहेत. यात 9 लाख 66 हजार 797 पुरुष तर 8 लाख 79 हजार 431 स्त्री मतदार असणार आहेत. इतर मतदारांची संख्या 86 इतकी आहे. या मतदारसंघात दिव्यांग मतदारांची संख्या 6 हजार 790 इतकी असल्याचे श्री. द्विवेदी यांनी सांगितले.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील 203 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका मतदान केंद्राची सर्व जबाबदारी ही महिला अधिकारी-कर्मचार्‍यांना दिली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

आचारसंहिता भंगाबाबतच्या आलेल्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आचारसंहिता जारी केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2 हजार 768 लिटर अवैध दारु जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 1250 शस्त्रपरवाना जमा करण्यात आले आहेत तर 16 हजारांहून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.