Breaking News

म्हसवडला आज सिद्धनाथ मंदिरातील भुयारी शिवलिंग दर्शनाची भक्तांना पर्वणी


म्हसवड, (प्रतिनिधी) : येथील सिद्धनाथ मंदिरातील भुयारात असलेले स्वयंभू शिवलिंग दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येते. उद्या (सोमवार) महाशिवरात्रीला या भुयारातील शिवदर्शनाची पर्वणी भक्तांना लाभणार आहे.

श्रीधरस्वामींच्या काशिखंड या ग्रंथामध्ये कालभैरवाच्या उत्पत्तीविषयीच्या माहीतीनुसार शिव आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठ कोण? असा वाद निर्माण झाला. त्यावेळी गायत्री म्हणाली शिवस्वरुप ब्रम्ह अग्रगण्य आहे. सर्व काही शिवाच्या अधिन असते. त्यामुळे सर्वश्रेष्ठ शिवच आहे. हे ऐकून ब्रम्हा आणि विष्णू यांना राग आला व त्यांनी गायत्री, शिवाचा निषेध केला. त्यामुळे क्रोध अनावर लेल्या शंकरांनी आपला उजवा हात क्रोधाने झटकला व त्यावेळी भूजदंडातून महांकाळ म्हणजेच काळभैरवाची उत्पत्ती झाली. त्याचवेळी शिवाच्या श्रेष्ठत्वाची प्रचिती सर्वांना आली व शिवशंकर लिंगरुपाने म्हसवड येथील भूयारात स्थित झाले. त्यामुळे म्हसवडच्या सिद्धनाथाचे स्थान मूळ काशी विश्र्वेश्र्वर काळभैरव शंकराचे मानले जाते. शिवाचे रक्षणकर्ते व शिवअवतार म्हणून काळभैरव म्हणजेच सिद्धनाथ व पत्नि जोगेश्र्वरी येथील मंदिराच्या गाभार्‍यातील भूयारात सिहासनावर आरुढ झाले. मात्र हे भूयार फक्त महाशिवरात्रीच्या रात्री भाविकांना खुले केले जाते.

मंदिरातील सिंहासनावर असलेल्य मूर्तींना रोज सकाळी पंचामृत व गरम पाण्याने अभ्यंगस्नान घातले जाते, त्यावेळी भूयारातील स्वयंभू शिवलिंगावरही थेबं थेंब पडत असतात वर्षभर बंद असलेल्या भूयारातील शिवलिंगाला रोज जलाभिषेक होतो. हा पौराणीक शिल्पाचा एक आदर्श नमुना आहे

महाशिवरात्रीला भूयारातील शिवलिंगास पारंपारिक पद्धतीने जलाभिषेक व पंचामृताचा अभिषेक करुन दहिभाताची पूजा बांधली जाते. त्यानंतर हे शिवलिंग भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येते यावर्षी हा मान सालकरी दीपक गुरव यांचेकडे आहे. या भूयाराची उंची 12 फूट असून भूयारात उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. एकाच व्यक्तिला जाता येईल इतकी अरुंद वाट असल्याने एकावेळी केवळ 8 ते 10 भाविकानांच दर्शनासाठी सोडले जाते. या काळात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने मंदिर परिसराला छोटेखानी यात्रेचेच स्वरुप येते.