Breaking News

सुरक्षा रक्षकाकडून भाविकांना विठ्ठल मंदिरात मारहाण


पंढरपूर / प्रतिनिधीः
विठूरायाच्या दर्शनाला आलेल्या काही भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून मारहाण करण्यात आली. या वेळी महिलांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याने भाविकांमध्ये संतापाचं वातावरण असून या उद्दाम कर्मचार्‍यांना घरी पाठवावे,’ अशी मागणी केली जात आहे.

नाशिक जिल्ह्यातील सोनवणे व येवलेकर कुटुंबीय दर्शनासाठी विठ्ठल मंदिरात आले होते. दर्शन घेताना त्यांच्या कुटुंबातील लहान मुलगा खाली पडल्याने प्रियंका येवलेकर ही महिला त्याला घेण्यासाठी वाकली असता सुरक्षारक्षकांनी त्यांना धक्काबुक्की सुरू केली. सनी सोनवणे याने याचा जाब विचारल्याने वादावादी सुरू झाली. त्यातून सनी सोनवणे यांनाही मारहाण करण्यात आली. त्यांच्या आई व बहिणीलाही धक्काबुक्की करण्यात आली. या मारहाणीत त्यांचे मंगळसूत्रही तुटले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचा दावा उपस्थित भाविकांनी केला आहे. याबाबत तक्रार दाखल करायला हे कुटुंब पोलिसात गेले; मात्र तिथे प्रकरण मिटविण्यात आले.
भाविकांना अशी मारहाण होत असल्यास दर्शनाला कोण येणार, असा सवाल भाविक करू लागले आहेत. मंदिर प्रशासनाकडून कोणीच यावर प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. मंदिरातील कर्मचार्‍यांना आकृतीबंध मंजूर करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे पगार वाढवले. भाविकांना मारहाण करण्यापर्यंत या कर्मचार्‍यांची मजल जात असेल तर यांच्यावर कोण कारवाई करणार, अशी विचारणा वारकरी सांप्रदायाचे रामकृष्ण वीर यांनी केली आहे