Breaking News

नोकर्‍या काढून घेण्याचे पातक केंद्रातील सरकारचे


उदयनराजेंचा सरकारवर घाणाघात : कोरेगावमधील सभांतून हल्लाबोल

सातारा / प्रतिनिधी : पाच वर्षांपूर्वी लोकांना खोटी आश्र्वासने देऊन केंद्रात सरकार सत्तेवर आले. त्यानंतर लोकांना नोकर्‍या, खात्यावर 15 लाख, अच्छे दिन असं काहीच हाती लागलं नाही. उलट आज त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे देश आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. युवकांना नोकर्‍या तर नाहीच, परंतू ज्यांच्याकडे आहे ते काढून घेण्याचे पातक केंद्रातील सत्ताधारी सरकार करत आहे, असा हल्ला उदयनराजे भोसले यांनी आज कोरेगाव शहरातील विविध प्रचार मेळाव्यांत चढवला.
सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व मित्रपक्षांचे अधिकृत उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ बुधवारी कोरेगाव शहरात दोन मेळावे झाले. त्यामध्ये ते बोलत होते. आमदार शशिकांत शिंदे, नगरसेवक संजय पिसाळ, सारंग पाटील, जिल्हा परिषदेच्या सभापती वनिता गोरे, जिल्हा परिषद सदस्य जयवंतदादा भोसले, माजी सभापती अरुण माने, सुनील काटकर, सतीश चव्हाण, कोरेगाव पंचायत समिती सभापती राजाभाऊ जगदाळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अतूल शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.
कोरेगावच्या शिवरत्न हॉलमध्ये झालेल्या बुथ कमिटीच्या शिबीरात बोलताना उदयनराजे भोसले यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टिका केली. ते म्हणाले, ‘‘पाच वर्षांपूर्वी अत्यंत नियोजनबद्धपणे निवडणूक कॅम्पेन राबविली गेली. त्यात पुर्ण न होणारी आश्र्वासन देऊन जनतेची दिशाभूल केली गेली. मन की बात करुन 15 लाख रुपये खात्यात टाकणे, दोन कोटी युवकांना रोजगार, काळा पैसा परत आणणे अशा थापा मारल्या गेल्या. हे लोक सत्तेत आल्यानंतर व्हायचे तेच झाले. आश्र्वासने पाळली गेली नाहीत. देशातील लोकशाही संपूष्टात आणून हुकूमशाही सुरू झाली. आज देश आर्थिक गर्तेत अडकला आहे.’’
‘‘उद्योगांत मंदी आहे, जीएसटीमुळे सर्वच व्यावसायिक अडचणीत आले. उद्योगांची वाताहत आहे. व्यावसायिक-शेतकरी-व्यापारी हा वर्ग भरडला जातोय. त्यामुळे एकट्या उदयनराजेंना निवडून देऊन चालणार नाही, तर केंद्रातील सत्ता उलथून टाकण्यासाठी संपूर्ण देशात कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांच्या उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या. देशात आज परिवर्तनाची गरज आहे. मतदारांचा एक निर्णय चुकला तर तो दुरूस्त करण्यासाठी पाच वर्षे वाट पहावी लागते. त्यामुळे सावध होऊन निर्णय घेण्याची योग्य वेळ आली आहे,’’ असेही उदयनराजेंनी सांगितले.
आपल्या देशावर दिवाळखोरी लादली जात आहे. केवळ लोकसभाच नव्हे तर येत्या पाच महिन्यांत विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीचीच सत्ता स्थापन होणार आहे. एकदा चुकलेला निर्णय पाच वर्षे दुरुस्त करता येणार नाही. त्यामुळे येणार्‍या निवडणूकीकडे एक चळवळ म्हणून पाहिले पाहिजे. तरच हे अकार्यक्षम, थापेबाज, अन्यायकारक सरकार सत्तेपासून बाजूला जाईल’’ असे आवाहनही श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.
बुथ समिती सदस्यांना मार्गदर्शन करताना आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, ‘‘कोरेगाव तालुक्यातील 80 टक़्के मतदान उदयनराजेंना मिळेल, यादृष्टीने प्रत्येक बुथ समिती सदस्यांनी काम करायचे आहे. मनोमिलनात समेट झाला असल्याने आता प्रत्येक कार्यकर्त्याने कामाला लागावे. कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत राष्ट्रवादीचा विचार पोहचवावा. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानासाठी घरातून बाहेर यावे, असं काम कार्यकर्त्यांना करायचे आहे.’’
उद्याची लढाई देशातील परिवर्तनाची लढाई आहे. सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या हूकूमशाहीला लोकशाहीतून पराभूत करण्याची ताकद सत्ताधार्‍यांना दाखवावी, असे आवाहनही शशिकांत शिंदे यांनी केले. सारंग पाटील यांनी अत्यंत सोप्या शब्दात बुथ समितीच्या सदस्यांनी आगामी काळात कशा पद्धतीने काम करावे याची विस्तृत माहिती दिली. कोरेगावमधील व्यापारी, डॉक्टर्स, वकील, केमिस्ट यांच्या संघटनांच्या वतीने माहेश्र्वरी भवनात उदयनराजे भोसले यांचा सत्कार करण्यात आला. सर्वांनी श्री. छ. उदयनराजे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन डॉ. रमेश पाटील यांनी केले.
केंद्रातील सरकारने देशात एकप्रकारे अविश्र्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. ते नाहीसं करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या विचारांचे सरकार यावे लागेल. उदयनराजे केवळ कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाहीत. तर राज्यातील सर्व लोकशाही मूल्यांवर आधारित विचारधारेच्या पक्षांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे लोक त्यांच्या पाठीमागे उभे राहतील, असा विश्र्वास जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक ड. जयवंत केंजळे यांनी व्यक्त केला.