Breaking News

खासगी आयुष्याबाबत टीका करण्यास बंदी

Image result for भारत निवडणूक आयोग

सातारा / प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या प्राधिकारपत्राशिवाय कुठल्याही व्यक्तीला मतदान होत असलेल्या क्षेत्रात प्रवेश करता येत नाही. मुख्यमंत्री, मंत्री किंवा ती व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असली तरी त्याकडे आयोगाचे प्राधिकारपत्र असणे बंधनकारक आहे. निवडणुकीच्या निमित्ताने बाहेरुन येणार्‍या व्यक्तींनी प्रचाराचा कालावधी संपल्यावर त्या मतदारसंघात त्यांना थांबता येणार नाही. निवडणूक काळात जातीय किंवा धार्मिक भावना भडकावता येणार नाहीत. मतदारांच्या जातीय समुहांना मतदानासाठी राजकीय पक्ष किंवा संबंधित उमेदवारांना आवाहन करण्यास आयोगाने मज्जाव केला आहे.

निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळवलेल्या व्यक्तींनाच मतदार, उमेदवार, त्यांचे निवडणूक व मतदान प्रतिनिधी यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही मतदान कक्षात प्रवेश करता येईल. मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार किंवा अन्य उच्चपदस्थ कुणी व्यक्ती असली तरी निवडणूक आयोगाच्या प्राधिकारपत्राशिवाय त्यांना या अटीतून सवलत मिळत नाही. त्यामुळे ऐनवेळची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार आयोगाचे प्राधिकारपत्र संबंधितांकडे असणे आवश्यक आहे. कोणताही मंत्री तो किंवा ती उमेदवार असल्याशिवाय किंवा फक्त मतदानासाठी मतदार म्हणून आला असेल त्याशिवाय मतदान कक्षात किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करता येणार नाही. शासकीय कामाची निवडणूक मोहीम किंवा निवडणूक प्रचार कार्यासोबत सरमिसळ करता येत नाही. मतदाराला, पैशाचे किंवा अन्य कशाचेही प्रलोभन दाखवता येत नाही. मतदारांच्या जातीय समूह भावनांना आवाहन करता येत नाही. वेगवेगळ्या जाती, समूह किंवा धार्मिक किंवा भाषिक गट यांच्यामधील विद्यमान मतभेद वाढवील किंवा परस्पर द्वेष किंवा तणाव निर्माण करील असे कोणतेही काम करण्याचा प्रयत्न करु नये, असे स्पष्ट निर्देश आयोगाने दिले आहेत. इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित नसलेल्या खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर टीका करण्याची परवानगी संबंधित उमेदवार किंवा राजकीय पक्षांना नाही. तसे घडल्यास ते आचारसंहितेचे उल्लंघन होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचा, सूचनांचा विचार करुनच संबंधित उमेदवारांनी कृती करणे गरजेचे आहे.