Breaking News

कचरा डेपोप्रश्नीचे पाटणमधील उपोषण मागे


पाटण /प्रतिनिधी : येथील नगरपंचायतीने पाटण शहरातील नागरी वस्तीपासून जवळच असलेल्या पाटण स्पोर्टस क्लब स्टेडियमजवळ गेल्या वर्षभरापासून कचरा डेपो सुरू केला असल्याने या कचरा डेपोच्या विरोधात स्थानिक नागरिक व शेतकर्‍यांनी पाटण नगरपंचायतीच्या विरोधात अमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी सांयकाळी पाच वाजता जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर आणि तहसिलदार रामहरी भोसले यांच्या मध्यस्थीने हे उपोषण मागे घेण्यात आले. जरी हे उपोषण स्थगित केले असले तरी लोकशाही मार्गाने कचराडेपोविरोधातील आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले.

पाटण स्पोर्टस क्लबशेजारी बेकायदेशीर सुरू असलेला कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी स्थानिक शेतकरी, रहिवाशी व नागरीकांनी पाटण तहसील कार्यालयासमोर सोमवार, दि. 11 मार्चपासून बेमुदत उपोषण आरंभले होते. आज उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी सायंकाळी पाचवा. सुमारास विक्रमबाबा पाटणकरआणि पाटणचे तहसीलदार भोसले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यावर हे उपोषण स्थगित करीत असल्याचे उपोषणकर्ते शिवाजी लुगडे, संजय शिंदे, तुकाराम कदम, जंगम गुरूजी यांनी सांगितले.

या वेळी सुशांत शिंदे, योगेश घाडगे, संजय भोज, आकाश सांळुखे, प्रुथ्वीराज पवार, उदय कदम, शुभम सोनावले, अनमोल पाटील, संकेत महाडिक, सागर देवकांत, तेजस गायकवाड, रविंद्र कदम, प्रकाश सांळुखे, प्रताप कदम, बाबूराव शिंदे, जनार्दन ऐर, सदानंद नांगरे, लक्ष्मण मोहिते, संजय भोज यांच्यासह महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.