Breaking News

आनंदधाम परिसरातील रस्ते दुरुस्तीची मागणी


अहमदनगर / प्रतिनिधी : येथील राष्ट्रसंत आनंदऋषी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त (दि.28) शहरात विविध ठिकाणी तसेच आचार्यश्रींच्या समाधीस्थळी आनंदधाममध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी सकाळी शहरातील प्रमुख मार्गावरुन शांतीमार्च काढण्यात येऊन आनंदधाममध्ये 20 मार्च पासून व्याख्याने,प्रवचने असे कार्यक्रम होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर महानगरपालिकेने शांती मार्च मार्गावर साफसफाई, जंतूनाशक पावडर फवारणी तसेच आनंदधाम परिसरातील रस्त्यावर पॅचिंग, सफाई आदी कामे करावीत’’ अशी मागणी नगरसेविका मीना चोपडा यांनी केली.

याबाबत मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात चोपडा यांनी म्हटले की, आचार्यश्रींच्या पुण्यस्मृतीदिनी 28 मार्चला शहरातील नवीपेठ येथून सकाळी 7 वाजता धार्मिक परीक्षा बोर्डापर्यंत शांती मार्चचे आयोजन केले जाते. या दिवशी नवीपेठ ते घासगल्ली, तेलीखुंट, दाळमंडई, आडते बाजार, सराफ बाजार, जुना कापड बाजार, खिस्तगल्ली, संगम चौक, बुरुडगल्ली, वसंत टॉकीज रस्ता, सहकार सभागृह रोड या मार्गे शांती मार्च धार्मिक परीक्षा बोर्डावर जातो. आनंदॠषीजी पुण्यतिथीनिमित्त धार्मिक परीक्षा बोर्डावर दि. 20 ते दि. 28 मार्च दरम्यान धार्मिक कार्यक्रम, संध्याकाळी 7 ते 10 पर्यंत दररोज व्याख्यानमाला तसेच दि.28 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते.
या कार्यक्रमासाठी येणार्‍या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवून त्यास पॅचिंग करण्यात यावी तसेच सहकार सभागृह रोड, व्हिडीओकॉन रस्ता, धार्मिक परीक्षा बोर्ड समोरील रस्ता आदींची कामे तत्काळ हाती घ्यावीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.