Breaking News

फिनिक्स फाऊंडेशनने रुग्णसेवेने केला सावित्रीबाई फुले स्मृतीदिन साजरा


अहमदनगर/प्रतिनिधी
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्यावतीने मोफत आरोग्य व नेत्र तपासणी तसेच मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबीराला नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. महिला सरपंच सविता पानमळकर यांच्या हस्ते शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ.संजय शिंदे, माया आल्हाट, फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे आदिंसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जालिंदर बोरुडे म्हणाले की, सावित्रीबाईंनी शिक्षणाच्या माध्यमातून महिलांचे जीवन प्रकाशमान केले. स्त्री शिक्षणाची बीजे त्यांनी रोवल्याने महिला आज सर्व क्षेत्रात आघाडीवर दिसत आहे. समाजाच्या उध्दारासाठी सर्वस्वी पणाला लावणार्‍या अशा महापुरुषांचे विचार प्रेरणादायी असून, त्यांच्या विचाराने समाजात वंचित घटकातील रुग्णांसाठी फिनिक्स फाऊंडेशन कार्यरत असल्याचे सांगितले.

सविता पानमळकर म्हणाल्या की, सावित्रीबाई फुलेंच्या स्त्री शिक्षण चळवळीचा वटवृक्ष बहरला असून, महिलांनी सर्वच क्षेत्रात आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. अनंत अडचणींवर मात करीत त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. त्यांचे योगदान न विसरता येणारे आहे. त्यांच्या महान कार्य व योगदानाने आजच्या स्त्रीला प्रतिष्ठा व सन्मान मिळाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
गावातील संत सावता महाराज मंदिर येथे घेण्यात आलेल्या या शिबीरात 560 रुग्णांची मोफत आरोग्य तसेच नेत्र तपासणी करण्यात आली. तर मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी 135 रुग्णांची निवड करण्यात आली आहे. त्यांची पुणे येथील बुधराणी हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या शिबीरासाठी नगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील नागरिकांनी हजेरी लावली होती.