Breaking News

सामाजिक भावनेतून बहिरोबावाडीत चारा छावणी


कर्जत/प्रतिनीधी : दुष्काळामुळे पशुधन धोक्यात आलेले असल्याने त्यातून शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी कर्जत तालुक्यातील बहीरोबावाडी येथे दूध डेअरीचे संचालक रमेश यादव तसेच मुलगा सुधीर यादव या पितापुत्रांनी जनावरांची चारा छावणी सुरू केली आहे.

सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. जनावरांच्या चारा व पाणी प्रश्‍नाने गंभीर रूप धारण केले आहे. पावसाच्या अल्प प्रमाणामुळे शेतकरी वर्गाची मोठी परवड होत आहे. शासनाच्या जाचक अटीमुळे व कागदपत्रांची पुर्तता करत नाकीनऊ आल्याने चारा छावणी सुरू करण्यात दिरंगाई होत आहे. आपल्या भागातील पशुपालकांचे हाल होवू नये यासाठी रमेश यादव यांनी 6 मार्चपासून छावणी सुरू केली आहे. छावणीत सध्या 600 लहान मोठी जनावरे दाखल झाली आहेत. 

छावणीतील सर्व जनावर धारकांना 350 गोळी पेंड वाटप करण्यात आली. छावणीत दररोज ऊस, मका आणि ऊसाचे वाढे यांचे वाटप केले जात आहे. चारा छावणी सुरू करण्यासाठी शिवसेनेचे नेते बळीराम यादव, सरपंच विजय तोरडमल, रामराजे तोरडमल, नितीन तोरडमल, महेंद्र लाळगे, जयेंद्र यादव, निलेश यादव, दीपक यादव, शरद यादव यांनी विशेष सहकार्य केले.विश्‍वासाने चारा छावणीत जनावरे दाखल केलेल्या शेतकर्‍यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस सुधीर यादव यांनी व्यक्त केला.