Breaking News

सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाने दहिगाव-ने गटात जल्लोष -------


शहरटाकळी/प्रतिनिधी : डॉ. सुजय विखेंनी भाजपाचा झेंडा हाती घेत लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे. शेवगाव तालुक्यातील दहिगाव-ने गटातील बक्तरपूर, शहरटाकळी, भावीनिमगाव, दहिगावने, मठाचीवाडी, ढोरसडे, अंत्रे सह परिसरात उलटसुलट चर्चा घडत आहेत. असे असले तरी डॉ. विखेंच्या भाजपा प्रवेशाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. डॉ. विखेंचे जोरदार स्वागत या भागात होत असून विखे हाच आमचा पक्ष असे म्हणणार्‍या तरुणांची संख्या प्रचंड आहे. 

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीस अवघे काही दिवस बाकी असताना नगरदक्षिण लोकसभा मतदार संघातील राजकारण देशपातळीवर चर्चिले जात आहे. राजकारणातील मातब्बर नेत्यांच्या डोक्याला घाम फुटला असून राष्ट्रवादीकॉग्रेस पक्षाचे तळ्यात मळ्यात चालूच आहे. मागील सलग दोन लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या उमेदवारांचा पराभव येथे झाला असल्याने या वेळी ही जागा कॉग्रेसला मिळेल अशी अपेक्षा धरत डॉ. सुजय विखेंनी दोन वर्षांपासून प्रचार करत आघाडी घेतली. मात्र खुद्द शरद पवारांनीच दुसर्‍यांच्या मुलाचे हट्ट मी का पुरवू? असे म्हणत ही जागा कॉग्रेस पक्षाला देण्यास नकार दिला. 

राष्ट्रवादीचे स्वयंघोषित पुढारी स्वतःचा नावलौकिक वाढावा व प्रसिद्धी झोतात यावे यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. नेतृत्वही त्यांच्या अशा गोष्टींचे समर्थन करताना दिसते. त्यामुळे या परिसरातील राष्ट्रवादीचे निष्ठावान व तरुण कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. असे कार्यकर्ते शरीराने जरी राष्ट्रवादीत असले तरी मानाने मात्र फारच दुरावले असल्याचे चित्र आहे. त्यातच दहिगाव-ने गटात असणारी छुपी फुल-घड्याळ युती सर्वसृत आहे. त्यामुळे येत्या काळात छुप्या राजकारणाने येथील नेतृत्वाची डोकेदुखी वाढणार असून प्रसिद्धीस हपापलेल्या नेत्यांच्या सहकार्याने कोणते गडकिल्ले सर होणार हे मात्र वेळ आल्यावरच कळेल. 

डॉ. सुजय विखे यांनी आरोग्य शिबीरे व इतर सामाजिक उपक्रमातून या भागात मोठे कौतुकास्पद काम केले असल्याने जनतेच्या मनातील नेता अशी त्यांची प्रतिमा दहिगाव ने गटात तयार झालेली आहे. त्यामुळे डॉ. विखे यांचे स्वागत भाजपा तालुका उपाध्यक्ष गुरुनाथ माळवदे, भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस वाय डी कोल्हे, जेष्ठ नेते ताराचंद लोढे, एकनाथ खोसे, अच्चूतराव भागवत, अनिल खैरे, सुनील गवळी, भीमराज ठोंबळ, सुभाष वाघमारे,बाळासाहेब विखे, दत्तत्रत मगर, अमोल काटे, दत्तात्रय मगर, कल्याण जगदाळे, सुरेश थोरात,कल्याण शेळके, मोहन खंडागळे अविनाश ओहळे, बशीर पठान सह कार्ये कर्त्यानी स्वागत केले आहे.