Breaking News

भारताशी पंगा पडला ‘महाग!’; पाकिस्तानात महागाईचा आगडोंब; रुपया गडगडला, वस्तू मिळेनात


इस्लामाबादः तिजोरीत खडखडाट असताना भारताशी पंगा घेणे पाकिस्तानला चांगलेच महागात पडले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने जी पावले उचलली, त्यामुळे पाकिस्तानला हादरा बसला असून महागाई 8.2 टक्क्यांवर पोहोचली असून गेल्या काही वर्षातला तो विक्रम आहे. मोठी रक्कम मोजून जीवनावश्यक वस्तूही मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने आक्रमकपणे जी कारवाई केली आणि निर्णय घेतले, त्यामुळे पाकिस्तानला झटका बसला आहे. पाकिस्तानी रुपयांची किंमत घसरली असून शेअर बाजारातील घसरण थांबायला तयार नाही. गुंतवणूकदार दररोज गुंतवणूक काढून घेत आहेत. त्यात परकीय गुंतवणूकदारांनी आता युद्धसदृश्य वातावरणामुळे पाकिस्तानात गुंतवणूक करायची नाही, असा निर्धार केला आहे. दुसरीकडे गेल्या चार वर्षात नव्हती एवढी महागाई वाढली असून नागरिकांना त्याची झळ बसत आहे.

पाकिस्तानची निर्यात अगदीच थोडी असून सर्व गरजा आयातीवरच भागविल्या जातात. पाकिस्तान ‘ब्यूरो ऑफ स्टॅटेस्टिक्स’नुसार जानेवारीत महागाईचा दर 7.19 एवढा होता तो आता 8.2 वर गेला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत.

भारतातून आयात करणे पाकिस्तानला सर्वाधिक स्वस्त पडते; मात्र हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा सर्वाधिक पसंतीच्या देशाचा दर्जा काढून टाकला आहे, तर आयातीवर 200 टक्के कर लावला आहे. घसरता रुपया सावरण्यासाठी स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने अनेक निर्णय घेतले आहेत. व्याज दरातही 4.5 टक्के एवढी वाढ केली आहे. पाकिस्तानचा सर्वाधिक पसंतीच्या देशाचा दर्जा काढल्यानंतर भारत आणखी एक दणका देण्याच्या विचारात असून ‘साउथ एशियन फ्री ट्रेड एरिया’ म्हणजेच साफ्टातूनही पाकिस्तानला बाहेर काढण्याचा भारताचा प्रयत्न आहे.