Breaking News

केंद्रीय मंत्रीच देशद्रोही! मोदी यांच्या रॅलीला न येणारे देशद्रोही म्हणणार्‍या मंत्र्यांचीच दांडी


नवीदिल्लीः वादग्रस्त वक्तव्ये आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचे नाते तसे जुनेच आहे; मात्र यावेळी त्यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांचीच नाचक्की झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्प रॅलीला न येणारे लोक देशद्रोही असतील, असे वक्तव्य त्यांनी या रॅलीच्या आधी केले होते; मात्र रविवारी (3 मार्च) झालेल्या संकल्प रॅलीला स्वत: गिरीराज सिंह उपस्थित राहिले नाही. त्यांनीच ट्विट करून या संदर्भातील स्पष्टीकरण दिले आहे. सध्या त्यांचे आधीचे वक्तव्य आणि आत्ता ट्विटवरुन दिलेले अनुपस्थितीसंदर्भातील स्पष्टीकरण व्हायरल होताना दिसत आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तनुसार, 3 मार्चच्या रॅलीच्या आदल्या दिवशी गिरीराज यांनी रॅलीला जास्तीत जास्त समर्थकांनी उपस्थित राहावे असे सांगितले होते. पाटण्यातील गांधी मैदान येथे होणार्‍या मोदी यांच्या संकल्प रॅलीला जे येणार नाहीत, ते देशद्रोही असतील. या रॅलीमधून कोण पाकिस्तानच्या बाजूने आणि कोण भारताच्या बाजूने हे सिद्ध होईल. जे भारताबरोबर असतील, ते मोदी यांच्यासोबत असतील, तर जे पाकिस्तानच्या बाजूने असतील ते या रॅलीला येणार नाही,’ असे मत गिरीराज यांनी व्यक्त केले होते. या वक्तव्यावरून जनता दल युनायटेड, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या तिन्ही पक्षांनी गिरीराज यांच्यावर टीकाही केली होती
या वादग्रस्त वक्तव्यानंतर स्वत: गिरीराज सिंहच पंतप्रधानांच्या या रॅलीमध्ये सहभागी झाले नाहीत. त्यांनी ट्विट करुन आपल्या अनुपस्थितीचे कारण दिले. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘दोन दिवसापूर्वी नवादाहून पाटण्याला येताना माझी तब्बेत अचानक बिघडली. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्प रॅलीमध्ये सहभागी होऊ शकलो नाही. मोठी रॅली आणि पंतप्रधानांनी दिलेले भाषण टीव्हीवरून पाहिले. देशाच्या विकासासाठी आणि शत्रूचे डाव मोडून काढण्यासाठी जनता पुन्हा एकदा मोदी यांनाच पंतप्रधान बनवेल.’

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी रविवारच्या संकल्प रॅलीमध्ये भाषण करताना ‘दहशतवाद, गरिबी, भ्रष्टाचार आणि काळे पैश्याविरुद्ध कारवाई ही आपली प्राथमिक उद्दिष्टे आहेत, तर विरोधकांचे प्राथमिक उद्दिष्ट केवळ मोदी यांना हटवणे इतकेच आहे,’ अशी टीका विरोधकांवर केली होती. या रॅलीमध्ये मोदी यांनी मागील चार वर्षांत त्यांच्या सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला.