Breaking News

उस्मानाबादचा ट्रॅक्टरचालक सातार्‍यातील अपघातात ठार


सातारा / प्रतिनिधी : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा शहरातील अंजठा चौकात सोमवारी दुपारी उसाच्या चालत्या ट्रॅक्टरमधील चालक पडून जागीच ठार झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, मृत उस्मानाबाद जिल्ह्यातील असून तो पत्नी व दोन मुलांसोबत सध्या वडूथ ता. सातारा येथे राहण्यास होता. फिरोज रज्जाक पठाण (वय 32, मूळ रा. अंतरवस्ती ता. भूम, उस्मानाबाद) असे ठार झालेल्या ट्रॅक्टर चालकाचे नाव आहेे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी दुपारी फिरोज हा वडूथ येथून शेंद्रेकडे उसाच्या दोन ट्रॉली घेवून निघाला होता. चार वाजता त्याचा ट्रॅक्टर येथील अंजठा चौकात आल्यानंतर तो पुलावरील चढ चढत होता. जड उसामुळे चढ चढत असताना त्याला अडचण येत होती. याच दरम्यान त्याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला व तो चालत्या ट्रॅक्टरमधून खाली पडला. ट्रॅक्टरमधून खाली पडताना फिरोज जोरात ओरडला. 

परिसरातील नागरिकांनी पाहिले असता तो ट्रॉलीच्या चाकाखाली आला व क्षणात रक्ताच्या थारोळ्यात पडला. ही घटना पाहून परिसर अक्षरश: सुन्न झाला. फिरोज रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने त्याला बाहेर काढताना अनेक अडचणी आल्या मात्र तो जागीच गतप्राण झाला होता. फिरोज गेल्या एक महिन्यांपासून पत्नी व दोन लहान मुलांसोबत वडूथ येथे आला आहे. या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबियांना व इतरांना दिल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. पठाण यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट आल्यानंतर कुटुंबियांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.