Breaking News

तालुकास्तरावर निवडणूक प्रक्रियेचे कर्मचार्‍यांना प्रशिक्षण


अहमदनगर/प्रतिनिधी : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा निवडणूक यंत्रणेक़डून विविध कामांसाठी नियुक्त कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. आज संगमनेर, श्रीगोंदे, राहूरी येथे मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष तसेच निवडणूक प्रक्रियेदरम्यान स्थापन करण्यात आलेल्या विविध पथकांचे प्रशिक्षण घेण्यात आले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी तसेच शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पिराजी सोरमारे यांच्या मार्गदर्शनानुसार हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. संगमनेर येथे उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेतला. निवडणूक कामांसाठी नियुक्त करण्यात आलेले विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होत मंगरुळे यांच्यासह तहसीलदार अमोल निकम आणि मुकेश कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 श्रीगोंदे येथे सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच व्हीडिओ व्हिवींग पथक, भरारी पथक यांच्यासह विविध पथकातील अधिकारी-कर्मचारी यांचे प्रशिक्षण पार पडले. राहुरी येथेही सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि विविध पथकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षण व्यवस्थापनासाठी नियुक्त नोडल अधिकारी महेश पाटील यांच्यासह तहसीलदार मोहंमद शेख यांनी हे प्रशिक्षण दिले. कोपरगाव येथेही हे प्रशिक्षण पार पडले.