Breaking News

दुष्काळी सवलती लागू करण्याची काळे यांची मागणी


कोपरगाव ता/प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील रवंदे, पोहेगाव, सुरेगाव व कोपरगाव या महसूल मंडलात दुष्काळ जाहीर करावा. यासाठी या गावातील शेतकर्‍यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सदर याचिकेची सुनावणी होवून या चारही मंडलामध्ये दुष्काळ जाहीर करावा असे आदेश न्यायालयाने प्रशासनाला दिले होते. दुष्काळाच्या भीषण परिस्थितीत नागरिकांना दुष्काळी सवलती तातडीने लागू व्हाव्या या दृष्टीकोनातून आशुतोष काळे यांनी याचिकाकर्ते शेतकर्‍यांना सोबत घेवून कृषी आयुक्त तथा दुष्काळ देखरेख समितीचे अध्यक्ष सुहास दिवसे यांची पुणे येथे त्यांच्या कार्यालयात जावून भेट घेत निवेदन दिले. त्यांना भीषण दुष्काळी परिस्थितीची माहिती देऊन न्यायालयाच्या आदेशानुसार या चारही मंडलात दुष्काळाच्या सवलती तात्काळ लागू कराव्यात असे साकडे घातले.

कोपरगाव तालुक्यातील इतर चारही मंडलातील आणेवारी हि पन्नास पैशाच्या आत असून सर्वत्र दुष्काळाची भयावह परिस्थिती होती. त्यामुळे या भागातील शेतकरी सुनिल शिंदे, विठ्ठलराव आसने, केशवराव जावळे यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात दुष्काळ जाहीर व्हावा. अशा आशयाची याचिका दाखल केली होती. 

न्यायालयाने सादर करण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर व वास्तव परिस्थितीचा विचार करून कोपरगाव तालुक्यातील रवंदे, पोहेगाव, सुरेगाव व कोपरगाव महसूल मंडलात दुष्काळ जाहीर करावा असे आदेश प्रशासनाला दिले होते. मा.न्यायालयाच्या आदेशानुसार दुष्काळात होरपळत असलेल्या कोपरगाव तालुक्यातील रवंदे, पोहेगाव, सुरेगाव व कोपरगाव या महसूल मंडलातील शेतकर्‍यांना व सर्वसमान्य जनतेला दुष्काळाच्या सवलती तात्काळ लागू करून दुष्काळाची दाहकता कमी व्हावी. यासाठी शेतकर्‍यांसमवेत कृषी आयुक्त तथा दुष्काळ देखरेख समितीचे अध्यक्ष सुहास दिवसे यांची भेट घेतली असल्याचे आशुतोष काळे यांनी संगितले आहे.