Breaking News

माणमध्ये दुष्काळाच्या झळा आणखी तीव्र


पाण्याचे दुर्भिक्ष्य : चाार्‍याचे दरही भडकले, बळीराजा हैराण
दहिवडी / प्रतिनिधी : माण तालुक्याच्या उत्तर भागात दुष्काळाची तीव्रता वाढली असून चाार्‍याचे दरही भडकल्याने बळीराजा हैराण झाला आहे. येथील शेतकरी वर्ग चारा छावण्यांच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, तालुक्यातील विहिरींचे पाणीही खोल खोल गेले असून एप्रिल, मे महिन्यात तर आणखी भयावह परिस्थिती होणार असल्याची भीती शेतकर्‍यांतून व्यक्त होत आहे. वास्तविक माण तालुका हा राज्याच्या नकाशावर कायम दुष्काळी तालुका म्हणून गणला जातो. दर दहा वर्षांनी येथील जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागतो. 2012 साली असाच दुष्काळ पडला होता परंतु आता लगेच सात वर्षांनी पुन्हा दुष्काळाचे चटके माणदेशी जनतेला सहन करावे लागत आहेत. 2012 च्या दुष्काळात शासनाने चारा छावण्या सुरू करून पशुधन जगवले होते. परंतु शासनाने अद्यापही चारा छावण्या सुरू न केल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. माण तालुक्याच्या उत्तरेकडील इंजबाव, पर्यंती, कासारवाडी, संभुखेड, हवलदारवाडी, कारखेल यासह 16 गावांमध्ये भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे लोकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून टँकरची तब्बल पंधरा दिवसांनी खेप येत आहे. पाण्याअभावी पशुधन जगविणे अवघड बनले आहे. विहिरीही कोरड्या पडू लागल्या आहेत. शासनाने दुष्काळी माण तालुक्यामध्ये चारा छावणी सुरू करण्याची मागणी बळीराजाकडून होत आहे. सध्या लोकसभेच्या निवडणुकांचा माहोल असल्याने बळीराजाच्या दैन्याकडे कोण लक्ष देणार? असा सवाल निर्माण होत आहे.