Breaking News

‘मिशन शक्ती’प्रकरणी मोदींचे भाषण तपासणार; निवडणूक आयोगाची माहिती


नवी दिल्ली : भारताने अंतराळ क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी केली आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या ‘मिशन शक्ती’ मोहीमेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले भाषण तपासण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. मोदींच्या भाषणातून आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे का? याची तपासणी करण्यात येणार आहे. 

माकपने यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीही पंतप्रधान मोदींविरोधात तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. भूपृष्ठापासून 300 किमीवर अंतराळात भारतीय शास्त्रज्ञांनी अँटिसॅटेलाईट मिसाईलद्वारे एक ङएज लाईव्ह सॅटेलाईट उध्वस्त केले आहे. प्रत्येक भारतीयासाठी यापेक्षा मोठी अभिमानाची गोष्ट असून शकत नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर आचारसंहिता असताना मोदींनी केलेल्या या भाषणावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. मोदींच्या भाषणाची प्रत आयोगाने मागितली असून मोदींच्या या भाषणाची आयोग तपासणी करणार आहे. या भाषणातून आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे का? याची तपासणी निवडणूक आयोगाच्या चौकशी समितीतील अधिकारी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.


आचारसंहितेचे उल्लंघनाचा माकपचा आरोप
‘मिशन शक्ती’ मोहीमेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणातून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप माकपने केला आहे. याप्रकरणी माकपचे सरचिटणीस सीताराम येच्युरी यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहित लेखी तक्रार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: निवडणूक लढवत आहेत. तसेच निवडणुकीच्या काळात त्यानी भाषण केले आहे. हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असे येचुरी यांनी पत्रात म्हटले आहे.

मोदी काय अंतराळात गेले होते?
पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनीही मोदींच्या भाषणावर आक्षेप घेतला आहे आहे. मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केले असून त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. मोदी काय अंतराळात गेले होते?, अशी बोचरी टीकाही ‘मिशन शक्ती’च्या भाषणावरून ममता बॅनर्जींनी मोदींवर केली आहे.