Breaking News

शेतकर्‍यांची मुले लावारिस! भाजपच्या प्रवक्त्याचे बेताल वक्तव्य; संतापजनक पडसाद


मुंबई / प्रतिनिधीः
विविध पक्षातील राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्याची परंपरा कायम आहे. त्यामध्ये भाजपचे नेते आणि प्रवक्तेदेखील कमी नाहीत. या यादीत भाजपचा अजून एक बेताल वक्तव्याचा बादशहा आता चर्चेत आहे. शेतकर्‍यांची मुले लावारिस असतात, असे संतापजनक ट्वीट भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी केले आहे. त्यांच्या या ट्वीटविरोधात ‘सोशल मीडिया’तून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मराठा क्रांती वॉरियर या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेल्या एका ट्वीटला उत्तर देताना वाघ यांनी हे ट्वीट केले. शेतकरी पुत्र आणि सर्वसामान्यांचा आवाज असणार्‍या पत्रकारांना ट्रोल करू नका, असा इशारा मराठा क्रांती वॉरियरकडून देण्यात आला होता. या ट्वीटला वाघ यांनी, ‘आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात,’ असे ट्वीट केले आहे. त्यामुळे सध्या चौफेर संताप व्यक्त केला जात आहे. वाघ यांनी याआधीही बेताल वक्तव्ये केली आहेत. मोदी हे विष्णूचा अकरावा अवतार आहेत, असे त्यांनी म्हटलं होते. भाजपने वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना कोणत्याही माध्यमांशी बोलण्यास बंदी घातली होती.

दरम्यान, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांची मुले लावारिस असतात, या भाजपच्या प्रवक्त्यांच्या वादग्रस्त ट्वीटवर जयंत पाटील यांनी टीका केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना लावारिस म्हणणे हा शेतकर्‍यांचा मोठा अपमान आहे. यावरून भाजप सरकारला किती मस्ती चढलीय हे दिसून येते, असे पाटील सांगलीत बोलताना म्हणाले, तर ज्यांचे आई वडील मरण पावतात, त्यांना अनाथ म्हटले जाते. लावारिस म्हणजे बेवारस. आत्महत्या ग्रस्त शेतकर्‍यांची मुले परिस्थितीमुळे अनाथ झाली आहेत. त्यांना लावारिस म्हणून शेतकर्‍यांना अपमानित केले आहे. यासाठी माफी मागा, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे