Breaking News

कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून कामाला लागावे: खा. उदयनराजे


सातारा / प्रतिनिधी : निवडणुका दर पाच वर्षानी होत असतात. लोकशाहीत निवडणुक लढविण्याचा सर्वांना अधिकार आहे. तुम्हाला वाटत असेल की, उदयनराजेंना निवडून का? द्यायचे असा प्रश्र्न तुमच्या मनात पडला असेल. पण मी एकच सांगतो, माझ्यापेक्षा तुमचे हित पहाणारा दुसरा उमेदवार असेल तर माझी उमेदवारी मी माघारी घेईल. लोकसभेनंतर विधानसभेच्याही निवडणुका होणार आहेत. बर्‍याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण त्यावर मी बोलणार नाही. कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून कामाला लागावे, अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

 दरम्यान, सातारा जिल्ह्यातून राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना निवडून आणण्याचे कामही मीच करणार आहे. हा उदयनराजेंनी दिलेला शब्द आहे. ‘मैने एक बार कमिटमेेंट दि..तो मै खुदकी भी नही सुनता’ असा डायलॉंग मारून पुन्हा एकदा स्टाईलने कॉलर उडवली.

सातारा शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आज येथील कल्याण रिसॉल्ट येथे आयोजीत केला होता. या मेळाव्यास खासदार समर्थकांची उपस्थिती मोठ्या संख्येनी होती. यावेळी कृषी तज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, कॉंग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रल्हादभाऊ चव्हाण, नंदाभाऊ जाधव, शिरीष चिटणीस, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपगनराध्यक्ष सुहास राजेशिर्के, जिल्हा परीषदेच्या सदस्या अर्चना देशमुख, सुनील काटकर, संदिपभाऊ शिंदे, विजय काळे, रंजना रावत, बाळासाहेब गोसावी, रवी साळुंखे, शंकर माळवदे, नगरसेवक निशांत पाटील, किशोर शिंदे यांच्यासह आदी प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

खा. उदयनराजे म्हणाले, आज देशात या सरकारने कायदे बनवले आहेत. नव्याने निर्माण केलेल्या कायद्याची काय अवस्था होवून बसली आहे, ते आपण बघतच आहोत. अशा कायद्यांमुळे शेतकर्यांपासून बिल्डर, उद्योगपती अर्थिक गर्तेेत अडकला आहे. सेंट्रींग कामगारावर आज बेकारीची कुर्‍हाड कोसळली आहे. सर्वच क्षेत्रात मंदी निर्माण झाली आहे. देशातील शेतकर्‍यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतकर्‍यांच्या या उत्पादनाला दर मिळत नसल्याने आज शेतकरी कर्जबाजारी झाला आहेे. त्यामुळे आज शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढलेल्या दिसत आहेत. देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी कायद्यांमध्ये बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी देशात सत्तांतर झाले पाहिजे.

माझ्याबद्दल बोलले जाते मी, दहशत निर्माण करतो. परंतु मी एकच सांगतो माझ्याविषयी असे का बोलले जाते मला माहित नाही. दशहत म्हणजे काय हेच आपल्याला माहिती नाही. गेली 10 वर्षे तुम्ही खासदार म्हणून काम करण्याची संधी दिली. कोणतीही अपेक्षा न ठेवता मी मनापासून तुमची सेवा करत आलो आहे. संपूर्ण जिल्ह्यातील सर्वांची एकी असणे गरजेचे आहे. सर्वांच्या एकीने हा जिल्हा एक आदर्श जिल्हा बनला पाहिजे. माझी निवडणूक झाल्यावर भविष्यात आमदारकीच्या निवडणूका होणार आहेत. त्यावेळी पक्षाच्या आमदारांना निवडून आणण्यासाठी आपणच खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे रहणार आहे. हा उदयनराजेंचा शब्द आहे, असे खा. उदयनराजे यांनी शेवटी बोलताना सांगीतले.