Breaking News

चंद्रकांतदादा पाटील सातार्‍यातील भाजप नगरसेवकांच्या घरी

चंद्रकांतदादा पाटील साठी इमेज परिणाम

युतीचा उमेदवारासाठी नेटाने काम करण्याचे आवाहन
सातारा / प्रतिनिधी ः भाजप - शिवसेना युतीचे सातारा मतदारसंघातील उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या विजयासाठी सातार्‍यातील भाजपच्या सात नगरसेवकांनी नेटाने काम करावे यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी थेट नगरसेवकांच्या घरी जावून त्यांना प्रोत्साहित केले. बुधवारी रात्री ते सातार्‍यात आले होते. त्यांनी भाजपच्या नगरसेवकांना घरी गाठून युतीचे काम करण्यास सांगितले.
सातारा नगरपालिकेत सातारा विकास आघाडी व नगरविकास आघाडीची सत्ता आहे. पालिकेत भाजपचे निवडून आलेले 6 नगरसेवक असून एक स्वीकृत नगरसेवक आहे. या सातही नगरसेवकांवर युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचाराचे काम करण्याची मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. चंद्रकांतदादांनी थेट सातारा गाठत नगरसेवकांच्या घरी जावून त्यांची भेट घेतली. सभा, मेळावे घेण्याबरोबरच थेट नगरसेवकांच्या घरी जावून बोलणं, त्यांना मार्गदर्शन करणे हे मला अधिक संयुक्तिक वाटलं आणि म्हणून मी नगरसेवकांच्या घरी जावून त्यांना भेटत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. सातार्‍यातील विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी जनतेला अपेक्षित असणारी विकासकामे केली नाहीत. पुन्हा पुन्हा त्याच उमेदवाराला निवडून देण्याची पारंपारिक पध्दत आता बंद झाली पाहिजे. युतीचे उमेदवार माथाडी कामगारांचे नेते आहेत. जिल्ह्यात सुमारे दीड लाख माथाडी कामगार आहेत. या सर्वांनी प्रामाणिकपणे युतीच्या उमेदवाराला निवडून द्यावे यासाठी नगरसेवकांसह आम्ही सर्वांनी नेटाने काम केलं पाहिजे, असे पाटील याप्रसंगी म्हणाले. नगरसेवक विजय काटवटे, धनंजय जांभळे आदी यावेळी उपस्थित होते.