Breaking News

शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या संपाने पाटणला महाविद्यालये विस्कळीत


पाटण / प्रतिनिधी : राज्यातील शासकीय आणि निमशासकीय सर्व कर्मचारी यांना आश्वासित प्रगत योजना लागू असताना केवल राज्यातील सर्व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी यांना यापासून वंचित ठेवल्याबद्दल शिक्षकेत्तर वर्गांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. मागील चार वर्षांपासून सरकारला वारंवार संघटनेच्या वतीने निवेदन देवूनदेखील मागण्यांकडे शासनाने गांभिर्याने घेतले नाही. त्यामुळे संपाचे अस्त्र हाती घेवून पाटणमधील बाळासाहेब देसाई कॉलेजमधील शिक्षकेत्तर कर्मचारी दि. पाच मार्चपासून संपावर गेले आहेत. शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या संपाने पाटणला महाविद्यालयांतील कामकाज विस्कळीत झाले आहे.

महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना लागू असलेली 12 व 24 वर्षानंतर मिळणारी आश्वासित प्रगत योजना शासनाने 7 डिसेंबर 2018 आणि 13 फेब्रुवारी 2019 रोजी दोन वेगवेगळे शासन निर्णय काढून पुर्वलक्षीत प्रभावाने रद केली. या निषेधार्थ सर्व षिक्षकेत्त कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. या सोबतच या शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीवरील बंदी उठवावी या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचारी संप करीत आहेत. या संपामुळे विद्यापीठाच्या परीक्षा कामकाजावर मोठया प्रमाणात परिणाम झाला आहे. त्यामुळे महाविद्यालयीन कामकाज ठप्प झाले आहे.

पाटण येथील महाविद्यालयातील या संपास कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण यांनी प्रत्यक्ष भेट देवून संपकर्त्यांना पाठिंबा दिला. त्याबरोबच प्राध्यापक संघटनेचे पदाधिकारी प्रा. डॉ. सी. यू माने, प्रा. डॉ. व्ही. ए. कळत्रे, प्रा. व्ही. एस. पानस्कर, प्रा. डॉ. आर. के. निमट, प्रा. जी. एस. पट्टेबहादूर यांनीदेखील संपाच्या ठिकाणी येवून पाठिंबा दिला.

पाटणचे तहसिलदार रामहरी भोसले यांनीदेखील शिक्षकेत्तर सेवकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. महाविद्यालयीन कर्मचार्‍यांबाबत शासन खूपच उदासीन आहे. गेल्या चार वर्षात शासनाने शिक्षकेत्तर सेवकांच्या बाजूने कोणताही चांगला निर्णय घेतला नाही. वारंवार निवेदन देवूनदेखील मागण्यांकडे लक्ष देत नाही म्हणून आता मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.