Breaking News

मसूदला हलविले ‘जैश’च्या तळावर


नवी दिल्लीः ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझहर जिवंत असल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. पाकिस्तानी लष्कराने रविवारी(3 मार्च) संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास मसूद अझहरला रावळपिंडीतील रुग्णालयातून बहावलपूरमधील गोथ गन्नी येथील ‘जैश-ए-मोहम्मद’च्या तळावर हलवले. मसूद अझहरला किडनीचा आजार झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर पाकिस्तानच्या लष्करी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमूद कुरेशी यांनी अझहर पाकिस्तानातच असल्याची कबुली दिली होती. अझहर आजारी असून त्याला घराबाहेर पडणे शक्य होत नसल्याची माहिती कुरेशी यांनी दिली होती.


पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर कुरापती पाकिस्तानवर जागतिक स्तरावर प्रचंड दबाव वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर, ‘जैश-ए-मोहम्मद’सहीत बंदी घालण्यात आलेल्या सर्व दहशतवादी संघटनांसंदर्भातील आपल्या भूमिकेवरून पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चक्क यू-टर्न घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मसूदचा काळ्या यादीत समावेश करण्यासाठीचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडण्यात आला. बुधवारी अमेरिका, ब्रिटन, आणि फ्रान्सने हा प्रस्ताव मांडला. ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेनेच पुलवामा येथे दहशतवादी हल्ला केला, असे या प्रस्तावात म्हटले गेले आहे. मसूद अझहरवर शस्त्रबंदीसह आंतरराष्ट्रीय प्रवासबंदीही करावी तसेच त्याची संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी विनंती अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने या प्रस्तावाद्वारे केली होती.
पाकिस्तानकडून एका निर्णायक धोरणा अंतर्गत बंदी घालण्यात आलेल्या सर्व दहशतवादी संघटना आणि ‘जैश-ए-मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझहरविरोधात कठोर कारवाई केली जाऊ शकते. अझहरविरोधात काय कारवाई करण्यात येईल?, याबाबतची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही; पण संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून अझहरला आंतराराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावास केलेला आपला विरोध पाकिस्तान मागे घेण्याची शक्यता आहे, असे स्पष्ट संकेतही अधिकार्‍याने दिले आहेत.