Breaking News

मिनरल वॉटरच्या बाटलीत चक्क टँकरचे पाणी

 
सातारा : दहिवडी येथील मुख्य बसस्थानकाच्या बाहेरील परिसरात काही दुकानदारांकडून ग्राहकांची चक्क फसवणूक सुरु आहे. मिनरल वॉटरच्या बाटल्यांमध्ये चक्क टँकरचे पाणी भरले असल्याची ओरड ग्राहकांकडून केली जात आहे. दोनच दिवसांपुर्वी एका जागृत ग्राहकाच्या हा बनाव लक्षात आल्यानंतर त्याने संबंधित दुकानदाराकडे याची विचारणा केली असता त्याने प्यायचे असल्यास प्या, नाहीतर चालते व्हा, अशा प्रकारची अरेरावी करुन ग्राहकाला वाटेला लावले. अन्न व औषध प्रशासन नेमकं कुठे आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

उन्हाळ्यात कित्येक ठिकाणी दरवर्षीच पाणी टंचाईचे संकट उद्भवते. वाम मार्गाने पैसे कमविणार्‍यासाठी खरंतर ही आयती संधी असते. याचा अनेक विक्रेते-व्यावसायिकांकडून गैरफायदा घेतला जातो. दुष्काळी माण-खटाव तालुक्यात सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिक मिनरल वॉटरच्या बाटल्या, कॅन मोठ्या प्रमाणावर खरेदी करीत आहेत. संबंधित विक्रेत्यांकडून मात्र टँकरचे पाण्याने भरलेल्या बाटल्या विकून ग्राहकांची फसवणूक करण्याचा प्रकार सुरु आहे. सोमवारी एका जागृत ग्राहकाच्या लक्षात ही बनवाबनवी आली. त्याने बसस्थानकाबाहेरील एका विक्रेत्याकडून मिनरल वॉटरची बाटली खरेदी केली. बाटली उघडून त्यातील पाणी प्यायले असता त्याला ते टँकरचे पाणी असल्याचे लक्षात आले. यासंदर्भात संबंधित दुकानदाराला विचारले असता, त्याने अरेरावीची भाषा केली. हे पाणी मी लॅबरोटरीमध्ये तपासणीसाठी पाठवितो असे म्हटल्यानंतर त्याने बाटलीचे पैसे ग्राहकाच्या हातावर ठेवून तोंड फिरवत विषयाला बगल दिली. खरंतर ग्राहकांची आर्थिक लूट सुरु असताना अन्न व औषध प्रशासनाचे जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी नेमके काय करीत आहेत, की कार्यालयामध्ये बसून झोपा काढीत आहेत, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले असल्याचे दिसून येत आहे. दुष्काळी भागातील जनतेला पाणी प्रश्नाबाबत काय उत्तर द्यायची असा प्रश्न राजकीय नेत्यांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे राजकीय नेते सार्वजनिक ठिकाणी येताना त्यांच्या कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह येतात आणि निघूनही जातात, अशी सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील परिस्थिती आहे. गेल्या काही दिवसापासून दहिवडी बसस्थानक परिसरात नव्याने टपर्‍या सुरु झाल्या आहेत. या टपर्‍यांमध्ये पिण्याच्या पाण्याची बिस्लरी बाटल्यांची विक्री होत आहे. या टपरीधारकांनी नफा वाढविण्यासाठी चक्क टँकरचे पाणी बिस्लरीच्या बाटलीत भरून सर्रास विक्री होत आहे. या टपर्‍यांमधून बर्‍यापैकी अवैध धंदे सुरु असतात. त्याचाच प्रत्यय काही प्रवाशांना आल. संबंधित दुकानदाराकडे सुमारे 40 बाटल्या पाणी शिल्लक होते. यामध्ये काही ओरिजनल बिस्लरी असाव्यात तर काही टँकरचे पाणी भरलेल्या बिस्लरीच्या बाटल्या होत्या. हा प्रकार दहिवडी बसस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वाराच्या मधल्या भागात सुरु असलेल्या टपर्‍यांमध्ये सुरु आहे. यावर दहिवडी नगरपंचायतीचा नव्याने सुरु झालेला आरोग्य विभाग तसेच जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यावर काय कारवाई करणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. 

स्थानिक प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे टँकरचे पाणी बिस्लरीच्या बाटलीमध्ये भरून चढ्या दराने विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. मुळातच ही सर्व दुकाने रस्त्याच्या गटारावर आहेत, त्यातच त्यांच्याकडून विक्री होत असलेल्या मालाच्या दर्जाबाबतचा असा अनुभव आलेला प्रवाशी पुन्हा कधीही काहीही खाण्याचा अथवा पिण्याचा विचारही करणार नाही. स्थानिक प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे.