Breaking News

चालकाच्या शॉपिंगसाठी एसटी कोठेही थांबते...सातारा/प्रतिनिधी : हात दाखवा आणि बस थांबवा, अशी घोषणा करणार्‍या ग्रामीण सेवेसाठीच्या बसगाड्या नियमाला आणि सेवाव्रताला हारताळ फासून प्रवाश्यांची सेवा न करताच बर्‍याचदा वाकुल्या दाखवत निघून जातात. मात्र चालकाच्या शॉपिंगसाठी भर गर्दीच्या रस्त्यावर चालू स्थितीत बस ठेवून आतील प्रवाश्यांच्या जीवाची पर्वा न करता चालक, वाहकांनी केलेल्या करामतीमुळे चालकाच्या शॉपिंगसाठी एसटी कोठेही थांबते, अशी नवी टॅगलाईन अस्तित्त्वात आल्याचा प्रत्यय सातार्‍यात आज आला.

शुक्रवार, दि. आठ मार्चला सकाळी घडलेला हा प्रकार. सातारा पाटेघर सातारा ही शटल सेवा देणारी बस (एमएच 12 ईएफ 6547) सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी सातार्‍यात बोगद्यानजिकच्या समर्थमंदिर बसस्टॉपवर उभी होती. गाडी चालू असली तरी चालकाच्या सीटवर तो नव्हताच. वाहकानेही बसमधून सुबाल्या केला होता आणि मास्तर, ड्रायव्हर दोघांशिवाय ही बस भर रस्त्यावर गजबजलेल्या चालू स्थितीत उभी होती. हा रस्ता उताराचा असल्याने चालक नसताना तांत्रिक चुकीमुळे कदाचित सुरू होवून समोरच्या दुकानात, वीजेच्या खांबावर किंवा उभ्या असलेल्या व्यक्तींच्या अंगावर जाण्याचा धोकाही होता शिवाय वाहतुकीची कोंडीही झाली होती. अधिक माहिती घेतली असता चालक भाजी, वडापाव आणि तंबाखू, सिगारेटसारख्या व्यसनांच्या वस्तू घेण्यासाठी वाहकाच्या बरोबरीने समर्थमंदिरालगतच्या दुकानांमध्ये खुषालचेंडूप्रमाणे फिरत होता. लोकमंथनच्या प्रस्तुत प्रतिनिधीने विचारणा केली असता, आमचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही, अशी दुरूत्तरे चालकाने केली. आगारप्रमुखांशी संपर्क साधला असता त्यांनी चालकावर कारवाई करू, असे नेहमीच्या पठडीतील गुळमुळीत उत्तर दिले. तर चालकाच्या एका नातेवाईक असलेल्या तोतया पत्रकाराने तुमच्या पेपरला बातमी छापू नका, मी गाडी बिघडल्याची बातमी माझ्या पेपरला छापणार आहे, अशी सारवासारव केली. तो ज्या वृत्तपत्राचा पत्रकार आहे, असे सांगत होता. तेथे चौकशी करता संबंधित व्यक्तीचा त्या दैनिकाशी काहीही संबंध नसल्याचे उघडकीस आले. एकंदरीत एका चालकाच्या बेपर्वाईसाठी वृत्तपत्रांना आणि यंत्रणांना वेठीस धरण्याच्या या प्रकाराची शहरात सर्वत्र चर्चा सुरू होती.