Breaking News

जालना-खामगाव महामार्गावरील धुळीच्या समस्येवर उपाययोजना करा! देऊळगाव मही,(प्रतिनिधी): जालना-खामगाव रस्त्याचे काम सुरू आहे, परंतु या कामामुळे रस्त्यावर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या गलथान कारभाराविरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना मैदानात उतरली आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देऊळगाव राजा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, जालना-खामगाव महामार्ग रस्त्यावर वाहनांची रहदारी अधिक आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकर्‍यांना, व्यापार्‍यांना धुळीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. वाहनांच्या उडणार्‍या धुळीमुळे या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे. या रस्त्यावर वाहनांमुळे धूळ मोठ्या प्रमाणात उडते.  दुचाकी, चारचाकी वाहनांना समोरून, मागून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे केव्हाही अपघात घडू शकतो. या अपघातांना जवाबदार कोण? असा प्रश्‍न स्वाभिमानी युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे यांनी उपस्थित करत धुळीच्या या समस्येवर उपायोजना त्याच बरोबर देऊळगाव मही येथे सुरू असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून गावकर्‍यांना होणार्‍या त्रासापासून मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दुसरी बाब म्हणजे जालना-खामगाव राज्य मार्गाचे दुहेरी महामार्गात रुपांतर झाल्याने या रस्त्याचे नव्याने काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. मात्र अतिशय संथगतीने काम सुरू असल्याने व रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने दुचाकी, चारचाकी वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे. देऊळगाव राजा ते चिखली 45 किलोमीटर रस्ता खोदून ठेवण्यात आला असून, त्यावर मुरूम टाकण्यात आला आहे. या मुरमावरूनच वाहतूक सुरू आहे. मोठी वाहने धावतात, तेव्हा प्रचंड धूळ उडून समोरचे वाहन काही काळासाठी दिसेनासे होत असते. प्रसंगी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. रस्त्याचे खोदकाम करून मुरूम टाकण्यात आला असला, तरी या कच्च्या रस्त्यावर पाहिजे त्या प्रमानात पाणी मारले जात नाही.सुरू असलेले काम व त्यावरून होणारी सततची वाहतूक यामुळे दिवसभर धूळ उडत असते. परिणामी रस्त्या शेजारी असलेल्या शेतातील पिके यावर वाईट परिणाम होत आहे़ परिणामी बाजारात गेल्यावर या मालाला कमी भाव मिळणार. त्यामुळे सुरू असलेले काम कंत्राटदाराने आपल्या नियोजित वेळतच पूर्ण करावे मात्र नागरिकांना व शेतकर्‍यांना त्रास होणार नाही़ याची खबरदारी घेऊनच काम करावे व दिवसातून दोनदा या मुरूमावर पाणी टाकावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडूनही करण्यात येत आहे़.

याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करण्यात आली नाही तर येत्या 5 एप्रिलला स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीच्या वतीने बसस्थानक चौक देऊळगाव मही येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानीच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी स्वाभिमानीचे युवा आघाडी जिल्लाध्यक्ष सतीश मोरे, जिल्ला सरचिटणीस शेख जुलफेकर, मधुकर शिंगणे, गणेश शिंगणे, गजानन रायते, सचिन साळवे यांची उपस्थिती होती.