Breaking News

होय, मी ही हुकूमशहाच! अ‍ॅड. आंबेडकर; सुपारी घेऊन टीका करणार्‍यांना ठोकून काढणार


अकोला/ प्रतिनिधीः
टीका करणारा प्रामाणिक असणे आवश्यक असून, सुपारी घेऊन टीका करणार्‍यास यापुढे ठोकून काढण्यात येईल, असा असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी अकोला येथे पत्रकार परिषदेत दिला. लढाई हुकूमशाहशी असल्याने काही बाबतीत मीही हुकूमशाहच आहे, असे ते म्हणाले.


वंचित बहुजन आघाडीने 22 जागांवरील उमेदवार जाहीर केले असून, उर्वरित 26 जागांवरच चर्चा होणार असल्याचे अ‍ॅड.आंबेडकर यांनी सांगितले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाघाडीत सहभागी होण्याची शक्यता मावळल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. वंचित बहुजन आघाडीवर टीका करणार्‍यांना लक्ष्य केले जात असल्यावर अ‍ॅड.आंबेडकर यांनी आक्रमकपणे आपली भूमिका मांडत थेट ठोकशाहीचे समर्थनच केले. टीका करणारा हा प्रामाणिक असला पाहिजे. सुपारी घेवून टीका करणार्‍यांना ठोकून काढण्यास मी सांगितले असून, माझा लढा समोर असलेल्या हुकूमशाहांसोबत आहे. त्यामुळे काहीबाबतीत मीसुद्धा हुकूमशाह असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.


हुकूमशाहीच्या बाबत अ‍ॅड. आंबेडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, की मी केवळ माझ्या संघटेनेबाबत बोलत असून, कोणीतरी सांगतो म्हणून टीका करण्यात येते. त्यामुळे संघटना वेठीस धरणे, उभी केलेली संघटना मातीत का घातली जाते. संघटनेच्या प्रमुखाची व्यथा समजून घ्या. सुपारी घेऊन टीका करू नये. त्यामुळे अशांना केवळ ट्रोल न करता त्यांना ठोकून काढा. राजकीय पक्षांकडून होणारी, सुपारी घेऊन होणारी टीका सहन केली जाणार नाही; मात्र माध्यमांवर राग नाही; हे उघडपणे लिहितात. नवा हुकूमशाह येत असून, लोकशाहीसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. कठोर निर्णय हकूमशाहीचे वाटत असल्यास ती बाब वेगळी. लोकशाहीतील निर्णयाची अंमलबाजवणी झालीच पाहिजे; त्याला हुकुमशाही म्हणत नाही, असेही अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

न्यायालयांची मनमानी

आदिवासींच्या जागांबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक निकाला दिला. संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या विरोधात जाऊन 10 लाख आदिवासींच्या जमिनी बळकावण्याचा निर्णय देण्यात आला आहे, असा दावा अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला. हा निर्णय अमान्य असून, न्यायालयाची ही मनमानी असल्याचा आरोप अ‍ॅड. आंबेडकर यांनी केला. त्यामुळे त्याविरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला पाठींबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

मनुवादी नको; गांधीवादी काँग्रेस हवी

सध्याची काँग्रेस ही मनुवादी असून, आम्हाला गांधीवादी काँग्रेस हवी आहे, असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले. वंचितांवर काँग्रेसकडूनच टीका केली जाते, असा आरोप करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी लढण्यासाठी काँग्रेस तयार नसल्याची टीका त्यांनी केली. राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी आमंत्रण प्राप्त झाले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.