Breaking News

न्यू विंडो निंबाचिया झाडा...!


चीनने मसूद अझहरविरोधात जी भूमिका घेतली, त्यात नावीन्य काहीच नाही. ती अपेक्षित अशीच आहे. दक्षिण आशियातच नव्हे, तर जगात भारत हाच स्पर्धक आहे आणि त्याला वरचढ होऊ द्यायचे नसेल, तर दहशतवादी विरोधी लढ्यात त्याला गुंतवून ठेवले पाहिजे, अशी चीनची मानसिकता आहे. अशावेळी पाकिस्तान हे एकमेव राष्ट्र चीनच्या मदतीला येते. पाकिस्तानची जाग तिक पातळीवर पाठराखण करणे ही पाकिस्तानपेक्षाही चीनची जास्त गरज आहे, हे आपण समजावून घेतले पाहिजे.

आपल्या संत साहित्यात दुर्जनाला कितीही सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला, तरी त्याचा स्वभाव बदलत नाही, याची कित्येक उदाहरणे आली आहेत. पाण्यात पडलेल्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍याच्या हाताला तो दंश केल्याशिवाय राहत नाही. हा आपल्याला वाचवितो आहे, याचे भानही त्या विंचवाला नसते. संत तुकारा महाराज म्हणतात, 

भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ॥
करितां नव्हे नीट श्‍वानाचे हे पुच्छ । खापरा परीस काय करी ॥
निंबाचिया झाडा साखरेचे आळे । बीज तैसे फळे येती तया ॥
तुका म्हणे वज्र भंगे एकवेळ । कठीण हा खळ तयाहूनी ॥

या अभंगाचा अर्थ आहे, जो मनी भाव धरतो, त्याच्या त्या शुद्ध भावासाठी मग दगडातदेखील देव उतरतो. माणसाच्या भक्तीमुळे पाषाणाला काळीज फुटून तो भक्तांसाठी धावून जातो; परंतु दुर्जन माणसापुढे सज्जन माणसाचे काहीएक चालत नाही.
ज्याप्रमाणे कुत्र्याचे शेपूट कितीही सरळ करायचा प्रयत्न केला, तरी ते वाकडेच राहते तसेच दुर्जनाचे देखील असते. कोणाच्याही आणि कोणत्याही उपदेशाने त्यांच्यात बदल होत नाही. लिंबाच्या झाडाला साखरेचे आळे घातले, तरी त्यात साखरेचा गोडवा येत नाही. लिंबाची मूळ चव कधीच बदलत नाही. तुकोबाराय म्हणतात, की दुर्जनांच्या वाटेला कधी जाऊ नये. त्याला सुधारण्याच्या भानगडीत तर पडूच नये. कारण एकवेळ इंद्राचे कठीण असे वज्र भंगून त्याचे तुकडे होतील; परंतु दुर्जन मनुष्य हा तर वज्रापेक्षादेखील कठीण आहे. अशा खळात बदल घडणे किंवा घडवून आणणे ही केवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. संत तुकारामांचा अभंग घेऊन मुद्दाम चीन आपल्याशी मसूद अझहर बाबतीत चार वेळा कसा वागला, याचा अनुभव आपल्या गाठिशी असताना आपण त्या राष्ट्राचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना अहमदाबादला बोलवून त्यांच्यासोबत झोके खेळतो, त्यांचा विशेष पाहुणचार करतो आणि तो देश विंचवाप्रमाणे कायम दंश करीत राहतो. माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नां डिस यांनी सर्वांत अगोदर आपल्याला बजावले होते, की पाकिस्तान हा खरा आपला शत्रू नाहीच, तर खरा शत्रू आहे, तो चीन. अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, डोकलाम आदी ठिकाणी त्याच्या सुरू असलेल्या कुरघोड्या आणि शेजारच्या देशांना आर्थिक मदतीच्या दबावाखाली आणून त्यांना भारतविरोधी भूमिका घ्यायला भाग पाडण्याची त्याची कृती अनेकदा माजी लष्करी अधिकार्‍यांनी आपल्या नजरेस आणूनही आपण त्या देशाकडे पाहिजे, तेवढे लक्ष दिलेलेे नाही. त्याचा परिणाम केवळ व्यापारी युद्धातच होतो असे नाही, तर दहशतवादाविरोधातील लढाईवरही होत आहे.
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानच्या ‘जैश ए मोहम्मद’ या संघटनेचा म्होरक्या मसूद अझर याला जागतिक दहशतवादी ठरवण्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पातळीवर भारताला बुधवारी अपयश आले. चीनने नकाराधिकार वापरून मसूदचा बचाव केल्याने भारताला धक्का बसला आहे. अर्थात ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी तीन वेळा चीननेच अशीच भू मिका घेतली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज चीनला गेल्या होत्या. त्यांनी चीनला पाकिस्तानच्या कुरापतींची माहिती दिली होती. ‘जैश’च्या भारतातील दहशतवादी कृत्यांची यापूर्वीही जगाला माहिती देण्यात आली आहे. चीन आणि पाकिस्तान सोडून जगातील सर्वंच राष्ट्रे अगदी त्यात मुस्लिम राष्ट्रेही आली, त्यांनी पाकिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षण तळांचा आणि तेथून सुरू असलेल्या भारतविरोधी कारवायांवर विश्‍वास ठेवून भारताला दहशतवादाविरोधात सहकार्य करण्याचे मान्य केले; परंतु या दोन देशांना मात्र दहशतवादाविरोधात कारवाया व्हाव्यात असे वाटत नाही. चीनला जागतिक आर्थिक महासत्ता व्हायचे आहे आणि त्यात त्याला भारत हा मुख्य स्पर्धक वाटतो आहे. भारत कायम दहशतवादाच्या सावटाखाली राहिला, तर त्याची विक ासाची गाडी चुकेल आणि तो मागे पडेल, असे चीनला वाटते. जिनजियांग प्रांतातील मुस्लिम दहशतवाद्यांविरोधात तसेच आपल्याच देशात हक्कांसाठी लढणार्‍यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊ न त्यांची आंदोलने अमानुषपणे चिरडून टाकणारा चीन भारतातील दहशतवादाबाबत नेमकी उलटी भूमिका घेतो. पठाणकोट, उरीनंतर पुलवामा येथे अतिरेक्यांनी घडवून आणलेला आत्मघाती हल्ला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. भारताने यापूर्वी पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाला पठाणकोटला बोलवून त्यांच्याकडे पुरावे दिले, त्याचे त्यांनी काय केले, याचा जाब चीनने आपल्या मित्राला विचारल्याचे कधी आठवत नाही. मुंबईवरील 26/11 चा हल्ला आणि त्यानंतरच्या कितीतरी दहशतवादी कृत्याचे पुरावे दिले, तरी त्यावर पाकिस्तान काहीही कारवाई करीत नाही. अमेरिकेने सांगूनही चीन ऐकत नाही. असे असेल, तर केवळ एखाद्याचा जागतिक दहशतवादी घोषित करण्यावर भर देण्याऐवजी आता जगानेच इराण, उत्तर कोरियावर जसा बहिष्कार घातला होता, तसा ब हिष्कार घालून पाकिस्तानची कोंडी केली, तर चीन आणि पाकिस्तानही जागा होईल. 

अझरला जागतिक दहशतवादी ठरवण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा मंडळाच्या निर्बंध समितीपुढे फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटन यांनी मांडला होता; मात्र या प्रस्तावावर चीन नकाराधिकार वापरून अझरला जागतिक दहशतवादी ठरवण्यात खोडा घातला. अर्थात तशी चिन्हे अगोदरपासून दिसत होती. अगोदर विचार करायला वेळ मागून घेणे आणि नंतर पुराव्यांची मागणी करणे हे सारे ठरवून होते.

पुलवामा येथील हल्ल्याची जबाबदारी ‘जैश’ने घेतल्यानंतर या अमेरिकेसह अन्य देशांनी भारताची बाजू घेत हा प्रस्ताव मांडला होता. समितीच्या सदस्यांना या प्रस्तावास आक्षेप घेण्याबाबत 10 दिवसांची मुदत देण्यात आली होती; परंतु चीन नकाराधिकार वापरणार असल्याचे हळूहळू स्पष्ट होत गेले. चीनचे परराष्ट्र प्रवक्ते ल्यू कांग यांनी, ‘चीन जबाबादारीने निर्णय घेणार आहे. कुठल्याही संस्थेचे काही नियम आणि प्रक्रिया असतात, त्यांचे पालन झाले पाहिजे. कुठलाही तोडगा सर्वमान्यच असला पाहिजे आणि त्यातून प्रश्‍न सुटण्याची शक्यता दिसली पाहिजे,’ असे जे वक्तव्य केले होते, ते पुरेसे स्पष्ट होते. चीन हा सुरक्षा मंडळाचा स्थायी सदस्य असून पाकिस्तानचा सर्वकालीन मित्र आहे. चीनने अझर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या प्रस्तावावर 2009, 2016, 2017 असा तीनदा नकाराधिकार वापरला आहे. नकाराधिकाराचा चीनने चौथ्यांदा वापर केला आहे. पुलवामा हल्ल्यावरून चीनने भारताचे समर्थन केल्यानंतर आपल्याला ‘जित मया’ चा आनंद झाला होता; परंतु तो क्षणभंगूर होता. ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर हा जागतिक दहशतवाद्याच्या निकषात बसणारा असून त्याला जागतिक दहशतवादी ठरवण्यास चीनने पुन्हा मोडता घातला, तर ते कृत्य अमेरिका आणि चीन यांच्या संबंधांच्या हितासाठी योग्य ठरणार नाही, असा इशारा अमेरिकेने आधी दिला होता. हा इशारा दिल्यानंतरही चीन बधला नाही. पुराव्याशिवाय कारवाईस आपला विरोध असल्याचे चीनने स्पष्ट केले. 26/11च्या मुंबई हल्ल्यानंतर हाफिज सईदलाही संयुक्त राष्ट्रसंघाने दहशतवादी घोषित केले होते; मात्र आज तो पाकमध्ये असून जाहीरपणे सभा घेतो, नवे अतिरेकी घडवतोच मात्र हाफिजची ‘जमात-उद-दावा’ही संघटना जगाच्या नजरेत येऊ नये म्हणून जाहीरपणे हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारत नाही. पा किस्तानमध्ये चीन सीपॅकमध्ये 55 अब्ज डॉलरची (3.8 लाख कोटी रु.) गुंतवणूक करणार आहे. याशिवाय काही प्रकल्पांसाठी 46 अब्ज डॉलर (3.2 लाख कोटी) खर्च केले आहेत. पाकमधील नोंदणीकृत विदेशी कंपन्यांपैकी सर्वाधिक 77 चीनच्या आहेत. चीन भारताला आपला सर्वात मोठा आर्थिक प्रतिस्पर्धी मानतो. भारताने दक्षिण आशियातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष न देता, अंतर्गत प्रश्‍नांवर गुंतून राहावे, अशी चीनची इच्छा आहे. चीन मसूदच्या विरोधात गेला असता तर भारताचे पारडे जड झाले असते. चीनमध्ये उईगर मुस्लिमांवर अनेक प्रकारचे निर्बंध आहेत. ते उघडपणे नमाज पढू शकत नाहीत. इस्लामिक सहकार्य संघटनेच्या देशांत केवळ पाकच या निर्बंधांना योग्य मानतो. त्यामुळे या आघाडीवरही चीनला पाकिस्तानची गरज आहे. भारत आणि अमेरिक ा यांचे सुमधूर संबंध चीनच्या विरोधात जातात. त्यामुळे चीनने मसूद अझहरचा शस्त्र म्हणून वापर केला आहे. जसे मसूदबाबत भारताला वाटते, तसेच भारतात आश्रय घेतलेल्या दलाई लामांबाबत चीनला वाटते.