Breaking News

लिंबखिंडीमधूनही शिवपुतळयाचे दर्शन घडणार


सातारा/ प्रतिनिधी : सातार्‍याचे नाक व शान म्हणून पोवई नाका ओळखला जातो. येथील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सर्वांनाच पराक्रम आणि परंपरेची प्रेरणा देत आहे. या शिवपुतळयाची उंची वाढवण्यात येवून, लिंबखिंडीमधूनही या पुतळयाचे दर्शन घडेल असे नियोजन आहे अशी माहीती देतानाच या ठिकाणी सन 2050 मधील संभाव्य वाहतुकीचा ताण येवू नये, म्हणून आम्ही उड्डाणपूल किंवा ग्रेडसेपरेटर करणार असे घोषित केले होते, आणि ते प्रत्यक्षात आणलेही.

 सातारचा विकासच होवू नये अशी कुत्सित भावना असलेल्या काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी आमच्या घेाषणेला हास्यास्पद ठरवण्याचा प्रयत्न केला. तथापी सातार्‍याची ऐतिहासिक परंपरा टिकवून ठेवून जर विकास करायचा असेल तर ग्रेड सेपरेटरसारख्या मोठया कामांची गरज आहे. या विकास कामांमुळे भविष्यात येथील व्यापार उदिमाला वेगळेच महत्व येणार आहे. विकासाची झलक आणि जिद्द या विकासकामांच्या माध्यमातुन सर्वाना पहायला मिळेल असा विश्वास सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे व्यक्त केले आहे.

सातारला लाभलेली शांतता आणि सर्वधर्मसमभावाची परंपरा आम्ही कसोशीने पुढे नेत आहेात. सातारचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी उड्‌डाणपूल, ग्रेडसेपरेटर, भुयारी गटारयोजना, कास धरण योजना, ब्रेक टेस्ट ट्रॅक, घनकचरा व्यवस्थापन अश्या अनेक विकास प्रकल्पांची घोषणा आम्ही केली होती, त्यावेळी ग्रेडसेपरेटरच्या कामाची काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी अवहेलना केली. सातारला ग्रेडसेपरेटर किंवा उड्‌डाणपूल कशाला पाहीजे ? त्याची गरजच नाही आणि ही कामे होवू शकणारच नाही, अश्या पध्दतीची मते कूपमंडुक प्रवृत्तीच्या व्यक्तींनी कुचेष्टेने मांडली. परंतु अशी टीका टिप्पणी आम्ही कधीही अंगाला लावून घेत नाही. त्यामुळे आम्ही विकास कामांवर लक्ष केंद्रीत केले. त्यानुसार अनेक विकास कामांबरोबर ग्रेडसेपरेटरच्या कामासही मंजूरी मिळुन, सदरचे काम सुरु झाले, असेही खासदार भोसले यांनी या पत्रकात म्हटले आहे.

सुमारे 2050 सालच्या वाहतुकीची व्यवस्था आणि वाहनांची संख्या विचारात घेवून, पोवईनाका येथील आठ रस्त्यांच्या ठिकाणी कामास सुरुवात करण्यात आली आहे. 50 टक्के काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, ग्रेडसेपरेटर नंतर या भागातील व्यापार उदिमाला वेगळे वलय येवून, महत्व येणार आहे. तसेच वाहतुकीला शिस्त लागेल. वाहतुकीचा ताण वाहनधारकांसह पादचा-यंना होणार नाही. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा लिंबखिंडीमधुनही दर्शन घडेल असा उंच पुतळा उभारण्याचे नियोजन आहे. याकरीता चौथ-याची उंची वाढवण्यात येईल. चौथ-यची उंची वाढवणे आणि पुतळा परिसराचे सुशोभिकरणाकरीता 01 कोटीचा वेगळा निधी मंजूर करण्यात आला आहे. काही जणांना भविष्याचा विचार करण्याची कुवत नसते, त्यांना स्वतःचा आणि फक्त वर्तमानाचा विचार करण्याची सवय असते, त्यांची अशी वृत्ती असली तरी ग्रेडसेपरेटरच्या कामाचे महत्व कधीच कमी होत नाही असेही मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.