Breaking News

जिल्ह्याभरात अवैध धंद्यावर पोलिसांची धडक कारवाई


पाथर्डी/प्रतिनिधी: पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांनी अहमदनगर जिल्ह्याचा पदभार घेऊन अवघ्या 24 तासाच्या आत पोलिस यंत्रणा कामाला लावत जिल्ह्याभरात अवैध धंद्यावर धडक कारवाई सुरू केली. त्यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शनिवारी पाथर्डी तालुक्यात 4 ठिकाणी अवैध व्यवसायावर धाडी टाकून सुमारे साडेतीन लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

शनिवारी गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस पथकाने शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांवर अचानकपणे छापे टाकल्याने अवैध धंदे वल्याची धांदल उडाली. शहरातील बोरुडे वस्तीवरील संगमेश्‍वर मळा येथे सचिन बोरुडे यांच्या घराच्या आडोशाला सुरू असलेल्या कल्याण व मुंबई मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी 3 लाख आठशे रुपयांची रुपयांची रोख रक्कम व मटक्याची साहित्य ताब्यात घेतले. याबाबत दिगंबर कारखेले यांच्या फिर्यादीवरून सद्दाम नसीर बेग रा.चिंचपूर रोड, स्वप्नील भागवत रा.आखार भाग,व सचिन बोरुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील मटक्याचा अड्याचा मुख्य चालक सचिन बोरुडे हा फरार असून इतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

त्याचबरोबर शहरातील आखार भाग मध्ये ही मटक्यावर छापा टाकून पोलिसांनी सहा हजार पाचशे रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली. मल्लिकार्जुन बनकर यांच्या फिर्यादीवरून मुसा नाशिर शेख, रा माळी बाभुळगाव, रोहिदास प्रेमचंद भगत, संतोष धोत्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी कासार पिंपळगाव येथील वृद्धेश्‍वर कारखान्यासमोर पायमोडे यांच्या टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या बिंगो मटक्याच्या अड्यावर छापा टाकून 38 हजार रुपयाची रक्कम ताब्यात घेतली. सुरेश वाबळे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी किशोर नामदेव फुलारी, जगदीश मधुकर पाथरकर, रोहिदास मानिक फुलारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर कासार पिंपळगाव येथे बस स्टँड जवळ पायमोडे यांच्या टपरीच्या आडोशाला सुखदेव पेत्रस तिजोरे हा अनाधिकृतपणे देशी दारू विकत होता. त्याच्याकडूनही 2264 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

याबाबत योगेश सातपुते यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांच्या आदेशानुसार व गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या धडक कारवाईत पोलिस उपनिरीक्षक रोहन खंडागळे, मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखिले, सुरज वाबळे, योगेश सातपुते, भागिनाथ पंचमुख, सचिन कोळेकर आदी कर्मचारी सहभागी झाले होते.