Breaking News

कणसेवाडीतील भ्रष्टाचारप्रकरणी खटला दाखल करा; संतोष जाधव यांचे जिल्हा परिषदेस निवेदन सादर


कातरखटाव/प्रतिनिधी : कणसेवाडी (ता. खटाव) ग्रामपंचायतीच्या मागील एका सरपंच व ग्रामसेवकाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाला असून याची सखोल चौकशी करुन दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य प्रतिनिधी संतोष किसन जाधव यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातील माहितीनुसार, सन 2015 ते सन 2017-18 या कालावधीत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 14 व्या वित्त आयोग व अन्य योजनांतून मोठ्या प्रमाणावर विकासकामे झालेली दाखविली आहेत. यापैकी रस्ता मुरमीकरण, नळ पाणी पुरवठा योजना व दुरुस्ती, शाळा पटांगण सपाटीकरण, एल.ई.डी. बल्ब खरेदी करणे, अंगणवाडी डिजीटल करणे, वृक्ष लागवड करणे, स्वच्छता मोहिम, जलयुक्त शिवार योजनेमधून पाझर तलावातील गाळ काढणे, स्ट्रीटलाईटवर बल्ब बसविणे आदी कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे.

यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या मासिक बैठक व ग्रामसभेमध्ये चर्चा, विचार विनीमय झाली मात्र संबंधितांनी ताकास तूर लागू दिला नाही. त्यानंतर आपण माहितीच्या अधिकाराखाली पत्रव्यवहार करुन माहिती प्राप्त केली. यामध्ये आपणास भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत पंचायत समितीच्या अधिकार्‍यांना अनेकवेळा लेखी-तोंडी तक्रारी दिल्या. परंतू संबंधितांनी त्याचे योग्य प्रकारे निराकरण केले नाही. या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी स्वत: लक्ष घालून दोषींवर तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा आपण स्वत: तसेच ग्रामस्थांच्या वतीने सोमवार पासून तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची गेली 15 दिवस सखोल चौकशी सुरु आहे. चौकशीचे काम पुर्ण झाले असून त्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना अहवाल सादर केला जाणार आहे. तक्रारदारांनाही त्याची एक प्रत दिली जाईल. त्यामुळे जाधव व ग्रामस्थांनी आंदोलनापासून परावृत्त व्हावे, असे आवाहन गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी दैनिक लोकमंथनशी बोलताना सांगितले.