Breaking News

इम्तियाज जलील यांना लोकसभेची उमेदवारी


औरंगाबाद : एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने इम्तियाज जलील यांच्या नावाची घोषणा केली आहे. औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून एमआयएम पक्षाकडून इम्तियाज जलील निवडणुक लढणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एमआयएमचे पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी काल रात्री उशीरा जाहीर केले. त्यामुळे आता औरंगाबादमध्ये तिहेरी तढत होणार आहे. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेचे सुभाष झांबड आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यात लढत होणार आहे. एमआयएम आमदार इम्तियाज जलील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाला असून ते औरंगाबादमधून निवडणुक लढवणार आहे. खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी दारूस सलाम येथे औरंगाबादमधील एमआयएम नगरसेवक, आमदार आणि पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये पक्षाची पुढची रणनिती ठरविण्यात आली. दरम्यान, जवळपास एक तास चाललेल्या बैठकीनंतर इम्तियाज जलील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला आहे. आमदार इम्तियाज यांच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यासाठी एमआयएमचे 25 नगरसेवक, कार्यकर्ते दोन दिवसांपासून हैदराबादेत तळ ठोकून होते. सोमवारी सकाळी 11.30 वाजता एमआयएमचे मुख्यालय दार उस सलाम येथे ओवेसी यांच्यासोबत दोन तास बैठक चालली. त्यानंतर सायंकाळी ओवेसींच्या जाहीर सभेनंतर पुन्हा बैठक झाली.त्यानंतर रात्री 11 वाजेच्या सुमारास घोषणा करण्यात आली. उमेदवारी निश्‍चित झाल्याचे कळताच इम्तियाज यांच्या समर्थकांनी शहरात विविध भागांमध्ये फटाके वाजवून व मिठाई वाटप करून जल्लोष केला.

औरंगाबादमध्ये तिहेरी लढत
औरंगाबाद लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सलग चार वेळा या मतदारसंघात विजय मिळवला आहे. या मतदारसंघात आजपर्यंत एमआयएमने उमेदवार उभा केला नव्हता. पहिल्यांदाच इम्तियाज जलील यांना ही उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता चंद्रकांत खैरे, सुभाष झांबड आणि इम्तियाज जलील यांच्यात तिहेरी लढत होणार आहे. औरंगाबादमध्ये तिसर्‍या टप्प्यात म्हणजे 23 एप्रिलला मतदान होणार आहे.