Breaking News

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सात वाहनांवर कारवाई


संगमनेर/प्रतिनिधी: संगमनेर तालुक्यातील प्रवरा, मुळा व म्हाळुंगी नदीपात्रात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या सात वाहनांवर दंडात्मक कारवाई करून तहसीलदार अमोल निकम यांनी ताब्यात घेतली आहे. काल गुरुवारी दि.14 रोजी सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.

प्रवरा, मुळा व म्हाळुंगी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूची नियमित वाहतूक केली जाते. तहसीलदार निकम यांनी नव्याने संगमनेरचा कार्यभार घेतल्यानंतर कसारा दुमाला शिवारातील प्रवरा नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करणारी पाच वाहने तर राजापूर शिवारातील म्हाळुंगी नदीपात्रातून एक व जांबूत शिवारातील मुळा नदी पात्रातून एक अशी सात वाहने ताब्यात घेतली. यात दोन ट्रॅक्टर, तीन जीप व दोन पिकअपचा समावेश आहे. या कारवाईमध्ये नायब तहसीलदार सुभाष कदम, सुधीर सातपुते, मंडलाधिकारी विवेक रासने, तलाठी पोमल तोरणे, प्रशांत हासे, सोमनाथ शेरमाळे, उमेश देवगडे, रवींद्र थोरात आदींचा समावेश होता.

प्रवरा, मुळा व म्हाळुंगी नदीपात्रातून वाळू तस्करीचे प्रमाणमोठ्या प्रमाणात आहे. तहसीलदार अमोल निकम यांनी संगमनेरचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ही पहिली मोठी कारवाई आहे. त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.