Breaking News

गट-तट न पाहता छावण्या मंजूर करा : पवार


अहमदनगर/प्रतिनिधी: जिल्ह्यात भयाण दुष्काळी परिस्थिती आहे. त्यासाठी जिल्ह्यात मोठ्या संख्येने छावण्यांची गरज असून प्रशासनाने तातडीने छावण्या मंजूर कराव्यात. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणताही गट-तट न पाहता छावण्या मंजूर कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

काल (शुक्रवार) सकाळी साडेअकराच्या दरम्यान पवार यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली. यावेळी छावण्या, टँकर व कुकडीच्या आवर्तनासंदर्भात चर्चा केली. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गरज आहे. परंतु टँकर सुरू झालेले नाहीत. तातडीने कुकडीचे आवर्तन सोडून गावतलाव भरून घ्यावेत, अशी मागणी पवार यांनी केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक आश्वासन देऊन छावण्या, टँकर सुरू करण्याबाबत सांगितले.यावेळी मुंबईतील पूल दुर्घटनेबाबत बोलताना पवार म्हणाले की, ही घडलेली घटना दुर्दैवी असून अशा प्रसंगी इतर वादविवाद टाळून पिडितांना मदत करणे गरजेचे आहे. परंतु सद्यपरिस्थिती तो पूल रेल्वेकडे होती की महापालिकेकडे, असा वाद करून जबाबदारी ढकलण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे.