Breaking News

डोंगरखंडाळा प्रकरणातील युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत

माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, रविकांत तुपकर यांनी घेतली पोलिस अधीक्षकांची भेट
बुलडाणा,(प्रतिनिधी): डोंगरखंडाळा येथे पुतळा हटवण्यावरून झालेल्या
वादाच्या पार्श्‍वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष
रविकांत तुपकर यांनी 9 मार्च रोजी सकाळी डोंगरखंडाळा येथे भेट देऊन
ग्रामस्थांनी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. गावकर्‍यांनी
कोणत्याही अफवांना बळी न पडता शांतता बाळगावी व जनजीवन पूर्ववत सुरळीत
करावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर माजी मंत्री डॉ. राजेंद्र
शिंगणे व रविकांत तुपकरांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ
यांची भेट घेतली व सुमारे दीड तास चर्चा केली. गावकर्‍यांनी संयम आणि
शांततेची भूमिका घेतली आहे. पोलिसांकडून तरुणांची धरपकड केली जात आहे. तर
काही तरुण अटकेत आहेत. पोलिसांनी गुन्हे दाखल करणार नाही असे आश्‍वासन
दिले होते तरी गुन्हे दाखल केले. त्यामुळे सामान्य जनतेत रोष पसरला आहे.
पोलिसांनी कारवाई करणे थांबवावे व निरपराध नागरिकांना वेठीस धरू नये अशी
मागणी डॉ.शिंगणे व तुपकरांनी पोलिस अधीक्षकांकडे केली.
डोंगरखंडाळा घटनेच्या पार्श्‍वभूमीवर रविकांत तुपकर व माजी मंत्री डॉ.
राजेंद्र शिंगणे यांनी 9 मार्च रोजी तातडीने जिल्हा पोलिस अधीक्षकांची
भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या प्रकरणात गावकर्‍यांच्या
भावना लक्षात घेऊन छत्रपती शिवरायांचा पुतळा हलवण्यासाठी किंवा जागा
बदलण्यासाठी गावकर्‍यांना विश्‍वासात घेणे गरजेचे होते. परंतु हेकेखोर
पोलिस अधिकार्‍याच्या चुकीमुळे हा प्रकार घडला असून याला पोलिस प्रशासन
जबाबदार असल्याचा आरोप डॉ.शिंगणे व तुपकरांनी यावेळी केला.
नागरिक धास्तावलेले आहेत. पोलिसांकडून धरपकड केली जात असल्याच्या वावड्या
उठत आहेत त्यामुळे दक्षता पाळणे गरजेचे आहे. पोलिसांनी निरपराध
नागरिकांना वेठीस धरू नये, पोलिसांचा कुठलाही ताफा गावात तैनात करू नका.
अजूनही पोलिस प्रशासनाने सबुरीने हाताळावे हुकूमशाही केली तर उद्रेक होईल
हे ध्यानात ठेवा असेही त्यांनी सुनावले. तसेच डोंगरखंडाळा, वरवंड, वाडी,
डोंगरशेवली गावातील नागरिकांवरील पोलिस कारवाई मागे घेतली नाही तर
जिल्ह्यात उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही नेत्यांनी
प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. डोंगर खंडाळा, वरवंड व परिसरातील
गावांमधील नागरिकांनी सुरळीतपणे आपले व्यवहार सुरू ठेवावे असे आवाहन
डॉ.शिंगणे व तुपकरांनी केले. यावेळी नरेश शेळके, राणा चंदन, संतोष जाधव,
पवन देशमुख उपस्थित होते.