Breaking News

पाकव्याप्त काश्मीरमधील चार दहशतवादी तळ बंद


नवीदिल्लीः भारत आणि पाकिस्तानदरम्यान सध्याच्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर आणि पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे भारतीय लष्कर आक्रमक पवित्रा घेत आहे. त्यामुळे भारताकडून संभाव्य हल्ला होण्याच्या भीतीने पाकव्याप्त काश्मिरातील 4 दहशतवादी तळ बंद करण्यात आले आहेत.
गुप्तचर यंत्रणांनी सरकारी सूत्रांना याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, पाकव्याप्त काश्मीरमधील निकिअल येथे 16 मार्च रोजी यासंदर्भात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अश्फाक बरवाल यांच्यात बैठक झाली. या बैठकीत भारतीय लष्कराकडून पुन्हा हल्ला होण्याची भीती असल्याने पाकव्याप्त काश्मीरमधील तळ बंद करण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
भारतातील राजौरी आणि सुंदरबनीच्या विरुद्ध दिशेला पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणार्‍या कोटली आणि निकीअल भागातील दहशतवाद्यांचे तळ आणि कार्यालये लष्करचा दहशतवादी अशफाक बरलकडून नियंत्रित केले जातात. तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील पाला आणि बाघ भागात जैशचे दोन दहशतवादी तळ आहेत. तसेच कोटली येथे हिज्बुल मुजाहिद्दीनकडून एक तळ चालवला जात आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 2019 मध्ये आजवर 634 वेळा पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे, तर गेल्या वर्षी 1629 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते.