Breaking News

वीजदरवाढीची जनतेला शॉक बसणार

Image result for वीजदरवाढी

मुंबई / प्रतिनिधीः
राज्यातील सर्वसामान्य जनतेला ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून महावितरणकडून विजेच्या दरात 6 टक्के वाढ होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने सप्टेंबर महिन्यात हा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून होणार आहे.
राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी 12 सप्टेंबरला वीज वितरण कंपन्यांच्या नव्या वीजदरांना मान्यता दिली होती. त्यानुसार महावितरण, अदानी आणि टाटा पॉवर यांचे वीजदर वाढले. येत्या चार दिवसांत महावितरणची दरवाढ लागू होईल आणि विजबिलात 6 टक्क्यांनी वाढ होईल. आयोगाने महावितरणला 8 हजार 268 कोटी रुपयांची दरवाढ करण्यास मंजुरी दिली होती. आयोगाच्या या निर्णयाची अंमलबजावणी नव्या आर्थिक वर्षात होणार आहे.
सध्या महावितरण घरगुती ग्राहकांकडून दरमहा 100 युनिटपर्यंत वीज वापरणार्‍यांकडून 5.30 रुपये प्रति युनिट इतका दर आकारते. त्यात आता 16 पैशांची भर पडणार आहे. 101 ते 300 युनिटपर्यंत वीज वापरणार्‍या ग्राहकांना प्रति युनिटमागे 24 पैसे जास्त मोजावे लागतील. 500 युनिटपर्यंत वीज वापर असल्यास ग्राहकांना वीज 15 पैसे महाग होणार आहे. याशिवाय वीजदरांसोबतच स्थिर आकारातही 10 रुपयांची वाढ केली जाणार आहे. हा तर 80 रुपयांवरुन 90 रुपये होणार आहे.
दरम्यान, महावितरणची 12 हजार 382 कोटी रुपयांची दरवाढ लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही दरवाढ विधानसभा निवडणुका झाल्यानंतर लागू केली जाण्याची शक्यता आहे.