Breaking News

उत्तम कामगिरी संधी उपलब्ध करून देते. -कुलदीप


मुंबई/प्रतिनिधी: कुणी कुणाला संघाबाहेर काढत नसते. कामगिरी सर्व काही ठरवित असते. आम्ही कुणालाही संघाबाहेर काढलेले नाही. केवळ आम्हाला मिळालेल्या संधीचा आम्ही योग्य उपयोग करून घेतला . उत्तम कामगिरी संधी उपलब्ध करून देते. अशा शब्दांत भारताचा अव्वल फिरकीपटू कुलदीप यादव याने फिरकीपटू रविचंद्रन अश्विनवरील प्रश्नाबाबत प्रतिक्रिया दिली.

यजुर्वेद्र चहल आणि कुलदीपच्या प्रभावी फिरकीमुळे अश्विनचे एकदिवसीय संघातील पुनरागमनाचे दरवाजे बंद झाले आहेत का, या प्रश्नावर कुलदीपने त्याची बाजू स्पष्ट केली. ‘‘आम्ही कधीही कुणाला संघातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच अश्विन आणि जडेजा हे दोघेही कसोटी संघात नियमितपणे चांगली कामगिरी करीत आहेत. आम्ही त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे. मी कसोटी संघात असताना त्यांच्याकडून बऱ्याच नवनवीन बाबी शिकलो,’’ असेही कुलदीपने नमूद केले.

‘‘अगदी खरे सांगायचे तर मी, चहल आणि जडेजा चांगली कामगिरी करीत असून संघाच्या विजयात आपापल्या परीने योगदान देत आहोत. माझ्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध १० पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळलो असल्याने त्यांच्या फलंदाजीच्या क्षमतांची मला जाणीव आहे. माझ्या गोलंदाजीवर आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शने सर्वोत्तम खेळ केला आहे, असे मला वाटते. त्यामुळे मी त्याच्या फलंदाजीचे बारकाईने निरीक्षण केले. त्या वेळी तो माझ्याविरुद्ध जास्त प्रमाणात पुढे येऊन खेळत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यामुळे पुढील सामन्यात त्याला कशी गोलंदाजी करायची, याचा अभ्यास मी केला आहे,’’ असेही कुलदीपने सांगितले.