Breaking News

नाशिककरांना हवाय स्व.यशवंतराव चव्हाणांचा वारस खासदार; दुरंगी? नव्हे चौ-पंचरंगी! भागः१


कुमार कडलग/नाशिक
स्व.यशवंतराव चव्हाण यांना बिनविरोध निवडून देणारा नाशिक लोकसभेचा मतदार कुठल्याही राजकीय पक्षाला गृहीत धरता येत नाही.यशवंतराव चव्हाणांवर भरभरून टाकलेला विश्वास दिल्लीत गेल्यानंतर तेव्हढ्याच जबाबदारीने त्यांनी सार्थ ठरविला.हा लोकसभा मतदार संघ दत्तक घेतो म्हणून मला मतदान करा अशा भुलथापा न देताही नाशिकच्या तत्कालीन खासदारांनी नाशिककरांच्या पारड्यात भरपूर दान टाकून विश्वास सार्थ ठरविला.नाशिकच्या कुशीत दिमाखाने उभा असलेला हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच मिग विमानं तयार करणारा एचएल हा केंद्रीय कारखाना नाशिक शहराच्या मध्यवस्तीत मोक्याच्या ठिकाणी ज्ञान साहित्याची पंढरी असलेले सार्वजनिक वाचनालय ही यशवंतरावांची देणगी आहे.त्यानंतर नाशिककरांचा प्रतिनिधी म्हणून दिल्लीत गेलेल्या एकाही लोकप्रतिनिधीला पिढ्यान पिढ्या उल्लेख व्हावा असे भरीव काम करता आले नाही.

यशवंतराव चव्हाणांनंतर सन २००९ पर्यंत या लोकसभा मतदार संघाला खासदार आहे की नाही अशी अवस्था होती.२००९ मध्ये राष्ट्रवादीचे समीर भुजबळ मतविभागणीचा फायदा होऊन निवडून आल्यानंतर पाच वर्ष ते विकास कामांपेक्षा अन्य मुद्यांमुळेच चर्चेत राहीले. खासदार निधीतून नाशिकच्या पश्चिमेला असलेले काही घरांचे एक छोटेस गाव विकसीत करण्यासाठी दत्तक घेतले.त्या पंचवार्षिकमध्ये या दत्तक गावाचा किती विकास झाला याचा शोध गावकर्यांनाही अद्याप लागला नाही.इतरांना तर त्या गावाचे नावही माहीत नाही.२०१४ च्या निवडणूकीत हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून छगन भुजबळ यांच्या सारख्या वजनदार नेत्याचा पराभव करून जायन्ट किलरचा मान मिळाला.या विजयाची कारणे अनेक आहेत.तत्कालीन खासदारांच्या आणि काकाश्रींच्या नावावर काही सन्माननीय मंडळीचा अपवाद वगळता दुय्यम कार्यकर्त्यांनी दाखवलेला "अतिउत्साह" सामान्य नाशिककरांमध्ये भुजबळांविषयी नाराजी व्यक्त करण्यास कारणीभूत ठरली.चौकडीतच अडकून पडलेला भुजबळ परिवार जनमानसात पाय पसरू शकला नाही.मोठ्या भुजबळांना भेटायचे तर आधी उंबर्यावरच्या मंडळींना पुजल्याशिवाय आत प्रवेश मिळत नसल्याने भुजबळांची जनतेशी असलेली नाळ आपोआप तुटली.त्याचा फायदा हेमंत गोडसे यांना मोदी लाटेवरून पोहत दिल्लीचा किनारा गाठण्यास नक्कीच झाला.

जायन्ट किलरचा मान मिळवून त्याचा हवा तेव्हढा फायदा विद्यमान खासदारांना लाटता आला नाही.समीर भुजबळ यांच्या काळात झालेली (न झालेली देखील) कामे खासदारकीच्या बलबुत्यावर झाली असे दाखविले जात असले तरी तत्कालीन राज्य सरकारमध्ये वजनदार मंञी म्हणून छगन भुजबळ यांचे ते श्रेय होते.तरीही २०१४ च्या लाटेत त्यांचा पराभव करून हेमंत गोडसे यांनी गेली पाच वर्ष त्यांच्याप्रमाणे काही चुका केल्यात.तिकडे असलेली चौकडी इकडेही उत्तरार्धात सक्रीय झाल्याने अलिकडच्या काळात कार्यसम्राट ही बिरूदावली मिरवतानाही जनमानसात तळागाळापर्यंत पोहचण्यात अपेक्षित यश आले नाही.चौकडीतच अडकून पडल्यामुळे पाच वर्षात झालेली विकासकामे प्रसिध्दीच्या झोतात आणता आली नाहीत.या पाच वर्षात तुलनात्मकदृष्ट्या अनेक कामे झाली.औद्योगिक वसाहतीतील प्रश्न असो नाहीतर इंडियन सिक्यूरीटी प्रेस,एकलहरे ओष्णिक केंद्राचा प्रश्न असो नाहीतर लोकल,पर्यटनात केलेले काम असो यासारख्या अनेक मुद्यांना सोडविण्याचा गोडसे यांचा प्रामाणिक प्रयत्नही या निवडणूकीत प्रसिध्दीच्या अभावामुळे फायदा किती होईल हा कळीचा मुद्दा आहे.काही गुणी माणसांच्या सानिध्याला चौकडीची नजर लागल्यामुळे सारे मुसळ केरात अशी अवस्था झाली आहे.

एकुणच नाशिकचा खासदार एका विशिष्ट चौकटीच्या बाहेर पडण्यास तयार नसल्याने अपेक्षित विकासाने नाशिककरांच्या नशिबाला सतत हुलकावणी दिली आहे.म्हणूनच नाशिककरांना स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या विकासाचा वारसा चालविणारा खासदार हवा आहे.भ्रष्टाचार्य विरूध्द कार्यसम्राट अशी या निवडणूकीच्या प्रचाराची टॕग लाईन चर्चेत असली तरी एकुणच निवडणूकीच्या हवेच्या दिशेचा वेध घेता यावेळी दुरंगी नव्हे तर चौरंगी पंचरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येणार नाही (क्रमशः)