Breaking News

अनाधिकृत वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाई


पारनेर / प्रतिनिधी: तालुक्यातील नागपूरवाडी येथील मुळा नदी पात्रात अनाधिकृत वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर पारनेर चे तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी दंडात्मक कारवाई केली.सकाळी सव्वासातच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यामध्ये तीन डंपरवर प्रत्येकी २ लाख 56 हजार 788 रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात आली.

नागपूरवाडी येथे अवैध अनधिकृत वाहतूक करणाऱ्या तीन डंपरवर तहसीलच्या पथकाने कारवाई करून हि वाहने ताब्यात घेतली. यामध्ये ज्ञानदेव बाळू आंधळे (रा. कर्जुले) गाडी क्रमांक (एम.एच 16 सी सी 0 8 11 ), अंकुश पोपट केदार {रा. पळशी} गाडी क्रमांक (एम.एच 16 ए वाय ३८४५) , सिताराम तुळशीराम वारे (रा.पळशी) गाडी क्रमांक (एम.एच १४ बी जे ३२३२) या तिन्ही वाहनावर हि कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये तहसीलदारांसोबत मंडल अधिकारी सचिन औटी, अव्वल कारकून पंकज जगदाळे, प्रशांत सोनवणे, तलाठी एस. एस. गोरे आदींचा समावेश होता.

पारनेर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळूची वाहतूक नियमित होत असते. यामुळे अनेक अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. परंतु अवैध वाहतुकीला अद्यापही आळा बसलेला नाही. तहसीलदारांनी या वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून आतापर्यंत वीस लाख रु.ची दंडात्मक वसुली केली आहे. या कारवाईमुळे वाळू वाहतूक करणाऱ्यांना चाप बसेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.