Breaking News

...त्या रिक्षाचालकाला नडले मोबाईलप्रेम c


सातारा / प्रतिनिधी : रिक्षात बसलेल्या एका तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची घटना सोमवारी सातार्‍यात घडल्याने खळबळ उडाली होती. पोलीस प्रशासनाने तातडीने संबंधित रिक्षाचालकाचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. मात्र ही संपूर्ण घटना घडण्यास संबंधित रिक्षा चालकाचे एअर फोन कानात अडकवून मोबाईलवरुन गाणी ऐकण्याचे प्रेम नडल्याचे समोर येत आहे. 

सध्या भारतातच नव्हे तर जगात मोबाईलच्या वेडापायी अनेक दुर्घटना घडल्याचे समोर येत आहे. मोबाईलच्या वेडापायी असे कितीही किस्से असले तरी मोबाईलचे वेड मात्र कमी झाल्याचे कुठेही निदर्शनास येत नाही. याउलट अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. सातार्‍यात सोमवारी घडलेली घटनाही अशाच मोबाईलवरुन गाणी ऐकण्याच्या वेडापायीच घडल्याचे समोर येत आहे. 

सोमवारी दुपारपासून संगमनगर येथून एका युवतीचे रिक्षाचालकाने अपहरण करण्याचा प्रयत्न केला व त्यामध्ये संबंधित युवतीने रिक्षातून उडी मारुन आपली सुटका करुन घेतल्याचे वृत्त सोशल मिडियावरुन प्रसिद्ध झाल्याने त्याची मोठी चर्चा होती. दरम्यानच्या काळात सदर युवतीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तातडीने शोध मोहिम राबवत संबंधित रिक्षाचालकाला ताब्यात घेतल्याचे वृत्तही तेवढ्याच गतीने प्रसिद्ध झाल्याने अनेकांनी कर्तव्यदक्ष पोलिसांचे अभिनंदनही केले. मात्र या घटनेत संशयित ठरलेल्या रिक्षाचालकाने कानात एअरफोन अडकवून गाणी ऐकण्याच्या नादात पाठीमागे पॅसेंजर म्हणून बसलेल्या युवतीने रिक्षा थांबवा असे म्हटल्याचे न ऐकल्याने व रिक्षा तशीच दामटल्याने या युवतीने आपले अपहरण होत आहे या भितीपोटी थेट रिक्षातून उडी टाकल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले. वास्तविक यामध्ये रिक्षाचालकाचा सदर युवतीचे अपहरण करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे समोर येत आहे. कानात एअरफोन अडकवत गाणी ऐकण्याच्या नादात पाठीमागे किती पॅसेंजर आहेत, संंबंधित तरुणी एकटीच आहे या बाबी त्याच्या लक्षातच आल्या नाहीत. त्यामुळे हा अनर्थ घडला. याप्रकरणात सदर युवकाची चूक अत्यंत साधीच असली तरी युवतीने रिक्षातून उडी मारल्यानंतर पाठीमागून एखादे मोठे वाहन आले असते आणि त्याखाली ती चिरडली गेली असती तर मोठा अनर्थ घडला असता. अर्थात असे काही घडले नसले तरी रिक्षाचालकाच्या चुकीची शिक्षा त्याला मिळालायच हवी. मात्र अपहरणासारखा गुन्हा माथी न मारता खरी परिस्थिती लक्षात घ्यावी.