Breaking News

पुनवडीत 100 किलो वजनाच्या परदेशी बनावटीच्या घंटेचा खणखणाट


सातारा / प्रतिनिधी : जावली तालुक्यातील पुनवडी गावात भैरवनाथाच्या मंदिरासमोर सुमारे 100 किलो वजनी ऐतिहासिक घंटा आढळून आली. 1881 मध्ये लंडनमधील जिलेट ब्लेंड कंपनीने ही घंटा तयार केली आहे. 140 वर्षांपूर्वी लंडन ते पुनवडी असा या घंटेचा झालेला प्रवास मनोरंजक आहे. 

कला व वाणिज्य महाविद्यालयाचे इतिहास विषयाचे प्रा. गौतम काटकर, संशोधक विद्यार्थी महेश गुरव आणि मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष मानसिंगराव कुमठेकर यांनी ही घंटा शोधून काढली आहे. पुनवडी गावाजवळ असणार्या भैरवनाथाच्या मंदिरासमोर एका झाडावर भली मोठी घंटा टांगून ठेवली आहे. या घंटेचे वजन सुमारे 100 किलोहून अधिक आहे. घंटेचा परिघ सुमारे 80 इंच आहे तर घंटा पंचधातूंपासून तयार करण्यात आली आहे. 140 वर्षांपूर्वी या घंटेचा लंडन ते पुनवडी, असा झालेला प्रवास उलगडला गेला. ही घंटा लंडन शहराजवळील क्रायडॉन या शहरात जिलेट ब्लेंड ऍन्ड कंपनीने तयार केली. ही कंपनी चर्च आणि अन्य इमारतीवर असणार्या मनोर्यातील घड्याळे आणि चर्चमध्ये वापरण्यात येणार्या घंटेसाठी प्रसिध्द होती. या कंपनीने जगातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी 20 टनाहून अधिक वजनाच्या स्मारक घंटा बनवून दिल्या आहेत. 

पुनवडी येथील घंटा ही याच कंपनीने 1881 साली तयार केली. ही घंटा प्रामुख्याने चर्चसाठीच बनवण्यात आली होती. ती लंडनहून जहाजाने भारतात मुंबईत आली. यावेळी पुनवडी गावातील अनेक लोक मुंबईत कापड गिरण्या आणि बंदरावरील गोदीत कामास होते. ही घंटा विकण्यासाठी आल्यावर मुंबईत आलेल्या मारूती लक्ष्मण पारटे यांच्या निदर्शनास आली. याचवेळी गावातील भैरवनाथाच्या मंदिरासाठी घंटा आणण्याचा गावकर्यांचा विचार सुरू होता. मारूती पारटे यांनी ही घंटा मंदिरासाठी विकत घेतली. 100 किलोहून अधिक वजनाची ही घंटा बैलगाड्यावर टाकून गावात आणण्यात आली. त्यानंतर ती भैरवनाथाच्या मंदिरात बसविण्यात आली. या संशोधन कार्यात संशोधक विद्यार्थी राहुल गंगावणे, युवराज जाधव, पुजा दळे , नम्रता पिंपळे यांनीही सहभाग घेतला.