Breaking News

पाकचे एफ-16 विमान पाडल्याचा भारताचा दावा अमेरिकेला अमान्यवॉशिंग्टन : पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडल्याचा भारताचा दावा अमेरिकेने फेटाळून लावला आहे. अमेरिकेकडून पाकला देण्यात आालेल्या एफ-16 या लढाऊ विमानांची मोजणी झाली आहे. यामध्ये पाकचे कोणतेही एफ-16 हे लढाऊ विमान गायब झाले नसल्याचे आढळले. पाकला देण्यात आलेली सर्व लढाऊ विमाने सुरक्षित आहेत, असे वृत्त अमेरिकेतील एका मॅगझीनने दिले आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राईक केले. त्यानंतर पाकिस्तानच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. या वेळी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत भारतीय हवाई दलाने 27 फेब्रुवारी रोजी पाकचे एफ-16 विमान पाडले होते. त्यानंतर भारताने 28 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या एफ-16 विमानाला पाडण्यासाठी डागलेल्या क्षेपणास्त्राचे तुकडे दाखविले होते; मात्र पाकिस्तानने आपण एफ-16 विमानाचा वापर केला नव्हता आणि आपले एक विमान भारताने पाडले नसल्याचे म्हटले होते.

यासर्व घटनेनंतर एका इंग्रजी मॅगझीनने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही देशांदरम्यान झालेल्या कराराचा एक भाग म्हणून पाकिस्तानने एफ-16 विमाने मोजण्यासाठी अमेरिकेला आमंत्रित केले होते. त्यात पाकचे कोणतेही एफ-16 हे लढाऊ विमान गायब झाले नसल्याचे आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. सुरक्षा अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, पाकला देण्यात आलेल्या एफ-16 विमानांची मोजणी करण्यात आली आहे. मोजणीमध्ये सर्व विमान सुरक्षित असल्याचे आढळले आहे.