Breaking News

युपीएससी परिक्षेत खंडाळ्याच्या स्नेहल धायगुडेचे यश; पोलीस दलात कार्यरत असलेल्या वडिलांचे स्वप्न वयाच्या 21 व्या वर्षी केले पूर्ण


लोणंद / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील बोरी गावातील सातारा पोलिस दलात कार्यरत असलेल्या नानासाहेब धागयुडे यांची कन्या स्नेहल धायगुडे (वय 21) हिने यूपीएससी परीक्षेत संपूर्ण देशात 108 वी रँक मिळवत जिल्हाधिकारी होण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्णत्वाला नेले.

ही कहाणी आहे सातारा पोलिस दलातील खंडाळा तालुक्यातील बोरी या गावातील नानासाहेब धायगुडे या सामान्य हवालदाराच्या कन्येची.जे बोरी गाव संपूर्ण महाराष्ट्रात शिव्या प्रथेसाठी कुप्रसिद्ध आहे, ज्या बोरी गावात ही प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे, त्याच बोरी गावात जन्मलेल्या धायगुडेंच्या या कन्येने आपल्या या वेगळ्या पराक्रमाने हे गाव आता देशभरात पोहोचवले आहे.

स्नेहल धायगुडे हिने प्राथमिक शिक्षण साखरवाडी (ता. फलटण), माध्यमिक शिक्षण माळेगाव (ता. बारामती) व त्यानंतर बी.एस्सी. ऍग्रीचे शिक्षण पुणे येथून पूर्ण केले आहे. उच्च शिक्षण झाल्यानंतर स्नेहल एक वर्ष पुणे येथेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. एक वर्षाच्या अभ्यासानंतर 2018 मध्ये तिने यूपीएससी परीक्षेची पूर्वपरीक्षा दिली. यामध्ये ती मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरली. मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी तिने सर्वस्व झोकून दिले आणि दुसर्याच प्रयत्नात तिला मुख्य परीक्षेतही यश आले. मुलाखतीचा टप्पा बाकी असल्याने तिने मुलाखतीसाठी तयारी केली. अखेर शुक्रवारी तिचा अंतिम निकाल आल्यानंतर ती देशामध्ये 108 व्या रँकने उत्तीर्ण झाल्याचे शिक्कामोर्तब झाले.

शुक्रवारी सायंकाळी हा निकाल आल्यानंतर बोरी या गावी नाना धायगुडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला. बोरीमध्ये ही बातमी पोहचल्यानंतर गावामध्ये अक्षरश: जल्लोष करण्यात आला. स्नेहलचे वडील नाना धायगुडे सातारा पोलिस दलात पोलिस हवालदार या पदावर आहेत. ते सध्या फलटण पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत. धायगुडे यांना स्नेहल व एक मुलगा आहे. धायगुडे कुटुंबिय शेतकरी असून यापूर्वी कोणीही उच्च पदावर नाहीत. असे असतानाही नाना धायगुडे यांनी मुलीच्या शिक्षणामध्ये हयगय केली नाही.
स्नेहल धायगुडे हिच्याशी संपर्क साधला असता ती म्हणाली, घरातील आई-वडिलांनी शिक्षणासाठी कोणतीही गोष्ट कमी पडू दिली नाही. घरची परिस्थिती जेमतेम असताना आपण कॉलेजमध्ये असतानाच जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. या स्वप्नाला गवसणी घालण्यासाठी दीड वर्षे अभ्यासाला पूर्णपणे झोकून दिले. कॉलेजमधील व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना जो ग्रुप तयार झाला त्याचा माझ्या व्यक्तिमत्वावर मोठा प्रभाव राहिला आहे. मुख्य परीक्षेसाठी ऍग्री हाच विषय ठेवला असल्याचे तिने सांगितले.
स्नेहल धायगुडे पुढे म्हणाली, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सर्व टप्पे पार केल्यानंतर शुक्रवारी निकाल असल्याचे माहित होते. मात्र निकाल लागणार होता म्हणून दिवसाचे जे शेड्युल ठरवले होते ते ब्रेक होवू दिले नाही. सकाळपासूनच लायब्ररीमध्ये अभ्यास करत बसले होते. दुपारचे जेवण झाल्यानंतर पुन्हा लायब्ररीमध्येच बसले होते. पाच वाजण्याच्या सुमारास युपीएससीच्या वेबसाईटवर व्हिजीट केल्यानंतर त्यामध्ये 108 व्या रँकला माझे नाव असल्याचे दिसले. स्वत: नाव पाहताच अत्यानंद झाला. लायब्ररीमधून बाहेर येवून ही गोड बातमी प्रथम कुटुंबिय व त्यानंतर गु्रपमधील सदस्यांना सांगितली. घरची परिस्थिती, शिक्षण हा निकाल असे टप्पे आता झाले आहेत. आता खरी परीक्षा अजून शिल्लक असून ट्रेनिंग घेवून समाजहितासाठी आदर्श अधिकारी होणे हे आपले पुढील टार्गेट असल्याचे स्नेहल धायगुडे हिने सांगितले. जिल्हाधिकारी मयूर गोवेकर यांच्यानंतर स्नेहल धायगुडे हिच्या रूपाने खंडाळा तालुक्याला दुसरा जिल्हाधिकारी होण्याचा मान मिळाला आहे. तसेच स्नेहलने खंडाळा तालुक्यातील व सातारा जिल्ह्यातील पहिली महिला जिल्हाधिकारी होण्याचा मान मिळवला आहे.