Breaking News

नरेंद्र पाटील यांच्याकडून उदयनराजेंवर तब्बल 23 प्रश्नांची सरबत्ती


सातारा/ प्रतिनिधी : सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांची खासदारकीच्या कालावधीत संसद कार्यकाळात उपस्थिती केवळ 23 टक्के असून त्यांच्या या 23 टक्के उपस्थितीवरच युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी हल्लाबोल करत 23 टक्के उपस्थितीचा, आम्ही विचारलेल्या 23 प्रश्नांचा न्याय जनता 23 एप्रिलला करेल आणि 23 मे रोजी निकाल आमच्या बाजूने असेल असा विश्वास सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. दरम्यान यावेळी त्यांच्या नरेंद्र ऍप या मोबाईलवरील ऍपचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खासदार उदयनराजेंवर तब्बल 23 प्रश्नांची सरबत्ती केली. यामध्ये तुम्ही दहा वर्षे संसदेत आहात मात्र, संसद कार्यकाळाच्या उपस्थितीत तुमचा नंबर शेवटून पहिला अवघ्या 23 टक्के उपस्थितीतचे कारण काय?. सातारकरांचे शून्य प्रश्न तुम्ही संसदेत मांडलेत याचे कारण काय?, लोकसभेतील एकाही चर्चेत तुम्ही सहभागी झाला नाही त्याचे कारण काय?, खासदार म्हणून तुम्हाला किती निधी मिळतो? तो निधी सोडून जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही किती निधी आणलात?, सर्व विधानसभा मतदार संघात समान निधी दिलात का? आणि नाही दिला तर का?, असा प्रश्नही नरेंद्र पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

सातारा जिल्ह्यात असलेल्या छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या प्रतापगडाची मालकी तुमच्याकडे आहे, आतापर्यंत या गडासाठी तुम्ही काय केले?, दहा वर्षात तुम्हाला साधे वस्तू संग्रहालय उभारता आलेले नाही, त्याचे कारण काय?, सर्वसामान्यांच्या एकाही प्रश्नासाठी रस्त्यावर न उतरता टोलनाक्याच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरला तुमचा टोलनाक्यात इतका इंटरेस्ट का?. टोलनाका रिलायन्सचा असला तरी दोन्ही टोलनाके तुमच्या समर्थकांचे आहेत हे सर्वांना माहित आहे. सातारा आणि कराड येथील पासिंग असलेल्या गाड्यांचा टोलमाफ करण्यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? दहा वर्षापूर्वी तुम्ही भूमाता दिंडी काढली त्यातील किती मागण्या पूर्ण करुन घेतल्या आहेत? साक्षात तुम्ही विरोध करुनही जरंडेश्वर कारखाना विकला गेला ज्यांनी तो विकत घेतला असे तुमचे न ऐकरणारे ते नक्की कोण आहेत? चालू असणार्‍या जिल्ह्यातील उद्योगधंद्यांना नख लावणे हे आपले धोरण आहे का?, तसेच सहा विधानसभा मतदार संघात आणि सातार्‍यात असणार्‍या आपल्या कार्यालयाचा नेमका पत्ता काय? कारण तुमचे कार्यालय म्हणजे राजवाडा तिथे गेल्यानंतर तुम्ही भेटाल याची शाश्वती नसते, कधी भेटाल यालाही काळवेळ नसतो असा अनुभव अनेकांना असल्याचेही पाटील यांनी नमूद केले.

उदयनराजेंनी जाहीर केलेल्या निर्धारनाम्यातील आकड्यांची हेराफेरी जाहीर करत पाटील यांनी चांगला सीए नेमून ती एकदा तपासून पाहा असा टोलाही यावेळी लगावला. मला केवळ पाच वर्षच संधी द्या, अशी विनंती करत नरेंद्र पाटील यांनी केली.